देवगड | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी मंडळांचे भजनी बुवा आणि मृदूंग वादक यांनी कणकवली येथील विश्रामगृहात आमदार प्रमोद जठार यांची भेट घेऊन आपल्या विविध समस्या व मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी आमदार जठार यांनी उपस्थितांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेत सहकार्याचे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना आमदार प्रमोद जठार म्हणाले, “भजन ही कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. भजनी बुवा आणि मृदूंग वादक ही परंपरा जपण्याचे मोलाचे कार्य करत आहेत. ही भक्तीपरंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी मी कायम आपल्या सोबत आहे.”
या भेटीदरम्यान बुवा संतोष कानडे, बुवा प्रकाश पारकर, बुवा संतोष मिराशी, बुवा श्रीकांत शिरसाट, बुवा गोपी लाड, मारुती मेस्त्री, हेमंत तवटे, सुदर्शन फोपे, पंढरी जाधव यांच्यासह जिल्ह्यातील अनेक भजनी बुवा व मृदूंग वादक उपस्थित होते.







