मालवण | प्रतिनिधी
मालवण शहरातील देऊळवाडा सागरी महामार्गावर दर सोमवारी भरत असलेला आठवडा बाजार बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी शिवसेना मालवण महिला आघाडीने केली आहे. या संदर्भात महिला तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, नगरसेविका निना मुंबरकर तसेच परिसरातील नागरिकांच्या वतीने नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी मालवण नगरपरिषदेचे समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, नंदिता हडकर, प्रसन्ना तुळसकर, रश्मी तुळसकर, दिनेश किडये, किरण राठोड आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, देऊळवाडा येथे गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे सोमवारी आठवडा बाजार भरत असून तो मालवण शहरासह वायरी, कुंभारमाठ, आडारी, कोळंब, घुमडे आणि परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत सोयीचा ठरत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील नागरिकांना या बाजाराचा मोठा लाभ होत आहे.
देऊळवाडा येथील आठवडा बाजार बंद करण्याबाबत शासन स्तरावर निवेदन देण्यात आल्याचे समजत असून, या प्रस्तावाला नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. बाजारामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्यास बाजार बंद करण्याऐवजी त्यावर पर्यायी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी भूमिका नागरिकांनी मांडली आहे.
यासाठी सोमवारी बाजाराच्या दिवशी पर्यायी वाहतूक मार्ग उपलब्ध करून देणे, रस्त्यालगत विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसाठी निश्चित बैठक व्यवस्था व नियमावली तयार करणे, अवजड वाहनांच्या वाहतुकीवर ठराविक वेळेस निर्बंध घालणे तसेच आवश्यकतेनुसार प्रभावी वाहतूक नियोजन करणे, अशा उपाययोजना राबविण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
लोकहिताचा विचार करून देऊळवाडा येथील सोमवारी भरणारा आठवडा बाजार कोणत्याही परिस्थितीत बंद करू नये. तसेच या मागणीची दखल घेऊन तहसीलदार, मालवण आणि मालवण नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडेही योग्य ती कार्यवाही करण्यासाठी पत्र पाठवावे, अशी विनंती नागरिकांनी नगराध्यक्षांकडे केली आहे.






