सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी
देशातील युवकांना राष्ट्रनिर्मितीच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांच्या नेतृत्वगुणांना व समाजाभिमुख दृष्टिकोनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या ‘माय भारत’ (मेरा युवा भारत) उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष नोंदणी अभियानाला सुरुवात झाली आहे. १ जुलै ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाद्वारे जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींना या उपक्रमाशी जोडण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.
या विशेष अभियानांतर्गत जिल्ह्यातील महाविद्यालये, शाळा, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था तसेच विविध शासकीय कार्यालयांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती आणि नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. युवकांनी मोबाईल क्रमांक, ई-मेल आणि आवश्यक कागदपत्रांच्या आधारे माय भारत पोर्टलवर विनामूल्य नोंदणी करून विविध शासकीय आणि सामाजिक उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
युवकांना www.mybharat.gov.in या संकेतस्थळावर किंवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंक व क्यूआर कोडच्या माध्यमातून सहज नोंदणी करता येणार आहे. या उपक्रमात सहभागी झाल्यानंतर युवकांना स्वयंसेवा, सामाजिक बांधिलकी, नेतृत्व विकास, कौशल्यवृद्धी, स्वयंसेवी उपक्रम तसेच विविध शासकीय कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभागाची संधी उपलब्ध होणार आहे.
‘माय भारत’ हा केवळ नोंदणीचा कार्यक्रम नसून, युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा देणारा आणि समाजाशी जोडणारा राष्ट्रीय उपक्रम असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या माध्यमातून युवकांमध्ये नेतृत्व क्षमता, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्रसेवेची भावना अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS), एनसीसी, शैक्षणिक संस्था, युवक मंडळे आणि विविध युवक संघटनांनी या विशेष नोंदणी अभियानात सक्रिय सहभाग घेऊन जास्तीत जास्त युवकांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मेरा युवा भारत, कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्वयंसेवा आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये योगदान देण्याची इच्छा असलेल्या युवकांसाठी हे अभियान महत्त्वाची संधी मानले जात असून, सिंधुदुर्गातील युवकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.







