‘शिंदे गटाची कणकवलीत ताकद शून्य’; लाडकी बहीण, मत चोरी आणि आर्थिक कारणांमुळे पराभव झाल्याचा दावा
मालवण (प्रतिनिधी) :
आमदार निलेश राणे यांनी केलेल्या ट्विटवरून कुडाळ-मालवणच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. माजी आमदार तथा ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी निलेश राणे यांच्या वक्तव्यावर पलटवार करताना, “मी रवींद्र चव्हाण यांचा लाभार्थी आहे, असे म्हणणे हा रवींद्र चव्हाण यांच्यावरच आरोप आहे,” असा दावा केला. महायुतीच्या विरोधात असलेल्या आमदाराला रवींद्र चव्हाण यांनी मदत केली असे निलेश राणे म्हणत असतील, तर त्याचे उत्तर रवींद्र चव्हाणच देतील, असेही नाईक यांनी स्पष्ट केले.
निलेश राणे यांच्यामुळेच आपले भाऊ निवडून आले, असा दावा केला जात असेल तर त्यांनी आपल्या भावाच्या विरोधात कसे काम केले, असा सवालही वैभव नाईक यांनी उपस्थित केला.
‘कणकवलीत शिंदे गटाची ताकद शून्य’
शिंदे गटाची कणकवलीत कोणतीही ताकद नसल्याचा दावा नाईक यांनी केला. “शिंदे गटाची कणकवलीत ताकद शून्य आहे,” असे सांगत त्यांनी निलेश राणे यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“मागील दोन निवडणुकांमध्ये मी कोणाला पराभूत केले, हे सर्वांना माहीत आहे. यावेळी मात्र लाडकी बहीण योजना, मत चोरी आणि आर्थिक कारणांमुळे माझा पराभव झाला,” असा दावा वैभव नाईक यांनी केला.
‘आम्ही काँग्रेससाठी बलिदान दिले’
आपल्या राजकीय प्रवासाचा दाखला देत नाईक यांनी निष्ठेच्या मुद्द्यावरूनही निलेश राणे यांच्यावर निशाणा साधला. “काँग्रेससाठी आम्ही बलिदान दिले आहे. काँग्रेसची पदे भोगून सत्ता गेल्यानंतर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. काँग्रेस आणि भाजपची लाभार्थी पदे घेऊन हे शिंदे सेनेत गेले आहेत. त्यामुळे यांनी मला निष्ठा शिकवू नये,” अशी टीका नाईक यांनी केली.
रवींद्र चव्हाण यांच्या संदर्भातील निलेश राणे यांच्या वक्तव्यावरूनही नाईक यांनी त्यांना लक्ष्य केले. महायुतीच्या विरोधात असलेल्या आमदाराला रवींद्र चव्हाण यांनी मदत केली, असे निलेश राणे म्हणत असतील, तर त्याचे उत्तर रवींद्र चव्हाण यांनी द्यावे, असे नाईक यांनी म्हटले.
दरम्यान, वैभव नाईक यांच्या या आरोपांमुळे कुडाळ-मालवणसह सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता असून, निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्याकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






