मालवणच्या समुद्रकिनारी आढळलेल्या दुर्मिळ अमूर ससाण्याला युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेच्या स्वयंसेवकांनी जीवदान दिले. कावळ्यांच्या हल्ल्यात सापडलेल्या या दुर्लभ पक्ष्याचे संवर्धन करत सुरक्षित स्थळी सोडण्यात आले.
मत्स्य लिलावाच्या ठिकाणी उमेश खांबोळकर यांना एक लहानसा, अपरिचित पक्षी जमिनीवर बसलेला दिसला. त्याच्याभोवती कावळे बोचत असल्याचे पाहताच त्यांनी तत्काळ सावधगिरी घेत पक्ष्याला वाचवले. याची माहिती त्यांनी प्रमोद खवणेकर व जगदीश तोडणकर यांना दिली. त्यांनी त्वरित युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेशी संपर्क साधला.
सूचना मिळताच भार्गव खराडे आणि अक्षय रेवंडकर काही क्षणांत घटनास्थळी पोहोचले. पक्ष्याला पाहताक्षणीच अक्षयने त्याची अमूर ससाणा म्हणून ओळख पटवली. कबुतरा इतक्या आकाराचा हा पक्षी — पिवळसर–नारिंगी पाय, करड्या छातीवर काळ्या आडव्या रेषा आणि काळ्या टोकाची शेपटी अशा वैशिष्ट्यांनी उठून दिसत होता. थोडासा घाबरलेला असला तरी तो जखमी नव्हता.
अक्षय रेवंडकर यांनी तातडीने दर्शन वेंगुर्लेकर, मेगल डिसोजा, साहिल कुबल आणि स्वाती पारकर यांना बोलावले. तज्ज्ञ पक्षी निरीक्षकांशी तसेच वन विभागाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती देण्यात आली.
दरम्यान, गुगलवर माहिती पडताळताना या अमूर ससाण्याबाबत महत्त्वाच्या तथ्यांचा उलगडा झाला. सायबेरिया व उत्तर चीनमधील प्रजनन क्षेत्रातून हा पक्षी दरवर्षी हिवाळ्यात भारतात येतो. तब्बल पाच हजार किलोमीटर अंतर एकाच उड्डाणात पार करण्याची ताकद या छोट्याशा पक्षात असल्याचे समोर आले.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तो सुरक्षित व नैसर्गिक अधिवासात सोडणे महत्त्वाचे असल्याचे ठरले. लिलावाच्या ठिकाणी कावळ्यांची संख्या जास्त असल्याने त्याला वेगळ्या, शांत भागात सोडण्याचे सर्वानुमते ठरले.
यानुसार युथ बिट्स फॉर क्लायमेटच्या स्वयंसेवकांची टीम — अक्षय, स्वाती, दर्शन, साहिल आणि भार्गव — पक्षाला घेऊन जवळच्या कांदळवन परिसरात गेली. दर्शन वेंगुर्लेकर यांनी हलक्या हाताने पक्षाला मुक्त केले. काही क्षण हवेत घिरट्या घालत तो सुरक्षित फांदीवर जाऊन शांत बसला आणि नंतर जंगलाच्या दिशेने उडून गेला.
यशस्वी बचावकार्याची खात्री होताच “टाटा, बाय-बाय” करत संस्थेची संपूर्ण टीम समाधानाने परतली.
स्थानिकांनी या संवेदनशील आणि पर्यावरणपूरक कार्याचे कौतुक केले आहे.







