मालवण शहरातील भरड येथील जुनाट गंजलेला वीज पोल थेट एसटी बसवरच येऊन कलंडल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. वीज पुरवठा खंडित झाला होता तसेच भरड परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. वीज वितरण कंपनीकडून करून कलंडलेला पोल पुन्हा उभा करण्यात आला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मालवण एसटी डेपोच्या दोन गाड्या सहलीसाठी गेल्या होत्या. या दोन्ही गाड्या आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास पुन्हा बस स्थानकात जात असताना भरड परिसरात दत्त मंदिर नजीकच्या रस्त्यावर असलेला जुनाट वीज पोल थेट एसटीवर येऊन कलंडला. यामुळे वीज तारा देखील ओढल्या गेल्या. मात्र, सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. या अपघातामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. तसेच यावेळी या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. याबाबत वीज वितरण कंपनीला माहिती दिल्यावर वीज कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत कलंडलेला वीज पोल पुन्हा उभा केला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
पुन्हा तोच वीज पोल उभा केल्याने संताप व्यक्त
भरड येथील सदर वीज पोल बदलण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे वारंवार केली होती. तरी अधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आज ही घटना घडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. तसेच मुळातून वाकलेला हा गंजलेला वीज पोल बदलून नवीन पोल न उभारता तोच पोल सरळ करून पोलाच्या मुळाशी तात्पुरती डागडुजी करून पुन्हा उभा करण्यात आल्याने स्थानिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त आहे.







