सिंधुदुर्गनगरी, दि. ४ : कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आज कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी येथील ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाला भेट देत महसूल कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी येथील अंगणवाडीला भेट देऊन बालकांशी मनमोकळा संवाद साधत शिक्षण, पोषण आणि उपलब्ध सुविधांची माहिती जाणून घेतली.
ग्राम महसूल अधिकारी कार्यालयातील भेटीदरम्यान विभागीय आयुक्त अग्रवाल यांनी प्रलंबित फेरफार नोंदी, वारस नोंदी तसेच विविध महसुली प्रकरणांच्या निपटाऱ्याचा आढावा घेतला. नागरिकांच्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करून प्रकरणे विनाविलंब निकाली काढावीत, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. महसूल सेवा अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
यानंतर त्यांनी रानबांबुळी येथील अंगणवाडीला भेट देत बालकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक, पोषण आणि आरोग्यविषयक सुविधांची पाहणी केली. अंगणवाडीतील चिमुकल्यांशी त्यांनी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या दैनंदिन उपक्रमांची माहिती घेतली. तसेच शैक्षणिक साहित्य, पोषण आहार आणि बालविकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचीही त्यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार सचिन पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, कुडाळचे गटविकास अधिकारी मनोज भोगटे, मुख्य सेविका राखी राणे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.