संत साहित्य आणि समकालीन विचारांचा होणार सखोल वेध
मालवण, प्रतिनिधी : संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक ह.भ.प. ॲड. देवदत्त परुळेकर लिखित ‘आजच्या काळासाठी तुकोबा’ या ग्रंथावर विशेष परिसंवादाचे आयोजन रविवार, ५ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण सभागृहात करण्यात आले आहे.
या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. राजन गवस उपस्थित राहणार आहेत. तर संत साहित्याचे अभ्यासक डॉ. नंदकुमार मोरे, समीक्षक-कवी डॉ. गोविंद काजरेकर आणि समीक्षक प्रा. संजीवनी पाटील हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
‘तुकोबांचे विचार आजच्या सामाजिक वास्तवाशी कसे जोडलेले आहेत?’ या विषयाचा सखोल वेध या परिसंवादातून घेण्यात येणार असून संत साहित्याच्या आधुनिक संदर्भांचा अभ्यास करण्याची संधी साहित्यप्रेमींना मिळणार आहे.
परिसंवादाच्या दुसऱ्या सत्रात निमंत्रित कवींच्या सहभागातून कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून साहित्य, विचार आणि काव्याचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे.
हा कार्यक्रम समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आणि बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. संत साहित्य, समकालीन विचार आणि काव्य यांत रस असलेल्या साहित्यप्रेमींनी या परिसंवादास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९४०४३९५१५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.







