छत्रपती शाहू महाराज हे केवळ एका संस्थानाचे राजे नव्हते, तर भारतीय समाजजीवनाला समतेची नवी जाणीव करून देणारे युगद्रष्टे समाजसुधारक होते. समतेचे तत्त्व केवळ विचारांत नव्हे, तर शासनव्यवहारातही उतरविणारे शाहू महाराज आधुनिक भारताच्या सामाजिक लोकशाहीचे अग्रदूत ठरले. समतेच्या विचारांना शिक्षणाची जोड देत त्यांनी सामाजिक क्रांती घडवून आणली, असे प्रतिपादन मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते यांनी केले.
स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य कैलास राबते उपस्थित होते. प्रारंभी त्यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. हिंदी विभागप्रमुख डॉ. एच. एम. चौगले यांनी प्रास्ताविक केले.
प्राचार्य राबते म्हणाले, “शिक्षण म्हणजे केवळ अक्षरओळख नव्हे, तर ते माणसाला विचार देणारी, स्वाभिमान जागवणारी आणि समाजाला नव्या मूल्यांकडे नेणारी परिवर्तनशील शक्ती आहे. म्हणूनच शाहू महाराजांनी शिक्षणाला सामाजिक न्यायाचा पाया मानला. समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली केली. शाळा, वसतिगृहे आणि विविध शैक्षणिक सुविधा उभारून त्यांनी ज्ञानाच्या प्रवाहाला सामाजिक समतेची दिशा दिली.”
ते पुढे म्हणाले, “सिंहासन हे सत्तेच्या वैभवासाठी नसते, तर ते लोककल्याणाच्या जबाबदारीचे प्रतीक असते. या विचारांची प्रचिती शाहू महाराजांच्या कारकीर्दीत दिसून येते. राज्यकर्ता हा जनतेच्या सुख-दुःखाशी एकरूप झाला, तरच सत्ता अर्थपूर्ण ठरते, हा संदेश शाहू महाराजांनी आपल्या कृतीतून दिला. त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयामध्ये राजकारणापेक्षा सामान्य माणूस आणि माणुसकी यांनाच सर्वोच्च स्थान दिले.”
स्त्री-सक्षमीकरणाचा पाया शिक्षणात असल्याची जाणीव शाहू महाराजांना होती. त्यामुळे त्यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली करून समाजाच्या प्रगतीला नवे अधिष्ठान दिले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करून त्यांनी केवळ एका व्यक्तीला नव्हे, तर भारताच्या उज्ज्वल भवितव्यालाच बळ दिले. आपल्या संस्थानात ५० टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करून शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाचा भक्कम पाया रचला, असेही प्राचार्य राबते यांनी सांगितले.
यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. उज्वला सामंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.







