मालवण दि प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील वायरी-देवली माळरान परिसरात काही गवेरेडे आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये उत्सुकतेसोबतच आश्चर्यही व्यक्त होत आहे.
पश्चिम घाटातील घनदाट जंगल आणि डोंगररांगांमध्ये वास्तव्य करणारे गवेरेडे आता मानवी वस्त्यांच्या जवळपास आणि किनारी भागातही दिसू लागल्याने वन्यजीव अभ्यासकांचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले आहे. गेल्या काही वर्षांत गव्यांची संख्या वाढल्याने तसेच अन्न आणि पाण्याच्या शोधात त्यांचा वावर नवीन भागांकडे वाढत असल्याचे वन्यजीव तज्ज्ञ सांगतात.
मालवणातील वायरी-देवली माळरान परिसरात गव्यांचा कळप दिसल्याची माहिती स्थानिकांनी वन विभागाला दिली. काही नागरिकांनी या गव्यांचे छायाचित्रण आणि व्हिडीओही केले आहेत. समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या या भागात गवेरेडे दिसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.





