मालवण (प्रतिनिधी)
मालवण शहरालगत असणाऱ्या वायरी येथील रिसॉर्ट मधील छोट्या स्विमिंग पूल मध्ये उंचावरून उडी मारल्याने श्रेणीक मिलिंद टाकळे (रा. इस्लामपूर ता. कागल, जि. कोल्हापूर) या २५ वर्षीय युवकांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज रविवारी दुपारी घडली. या प्रकरणी पोलीसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कागल तालुक्यातील इस्लामपूर येथील दहा मित्रांचा एक ग्रुप शनिवारी पर्यटनासाठी मालवणात आल्यानंतर हे सर्वजण वायरी येथील एका रिसॉर्ट मध्ये उतरले होते. यातील काहीजण रिसॉर्ट मधील स्विमिंग पूल मध्ये स्नानाचा आनंद लुटण्यासाठी गेले. लहान मुलांसाठी असलेल्या छोट्या स्विमिंग पूल मध्ये चार फुटाच्या भागामध्ये श्रेणीक याने आठ ते दहा फूट उंचीवरून उडी घेतली. श्रेणीत याची उंची असल्याने त्याची ही उडी थेट पुलाच्या तळाशी जाऊन आपटली. त्यामुळे डोक्याला जबर मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मित्रांनी त्याला तात्काळ मालवणच्या ग्रामीण रुग्णालयाता उपचारासाठी हलविले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. यां दुर्घटनेची माहिती श्रेणीक टाकळे याच्या कुटुंबियांना देण्यात आली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जितेंद्र पेडणेकर करत आहेत





