मालवण : मालवण आगाराच्या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ या पाच नव्या एसटी बसेस दाखल झाल्याने प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सुखकर प्रवासाचा लाभ मिळणार आहे. या बसेस उपलब्ध करून देण्यासाठी कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने मालवण आगाराच्या सेवेत महत्त्वाची भर पडली आहे.
नव्या बसेसच्या समावेशामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना दर्जेदार सार्वजनिक वाहतूक सेवा मिळण्यास मदत होणार असून आगाराच्या कार्यक्षमतेतही वाढ होणार आहे. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता नव्या बसेसची आवश्यकता होती. ती आता पूर्ण झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
या उपक्रमाबद्दल आमदार निलेश राणे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून मालवण आगारासाठी नव्या बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचेही आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
मालवणच्या विकासाच्या वाटचालीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणारे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात असून मालवण आगाराने विकासाच्या दिशेने आणखी एक भक्कम झेप घेतली आहे.





