मुंबई : शहराच्या गल्ल्यागल्ल्यांमधील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद शब्दांतून मांडणारे ज्येष्ठ संपादक संजीव साबडे यांचे ‘खाऊ गल्ली’ हे पुस्तक 24 जून रोजी रसिकांच्या भेटीला येत आहे. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमी (रवींद्र नाट्य मंदिर) येथे सायंकाळी 6 वाजता या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रंगणार आहे.
चार दशकांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत संजीव साबडे यांनी मुंबई, ठाणे आणि इतर शहरांतील खाद्यसंस्कृतीचा जवळून घेतलेला वेध या पुस्तकातून उलगडला आहे. विविध पदार्थ, त्यामागील कथा, खाद्यसंस्कृतीतील बदल आणि शहरांच्या चवींचा इतिहास यांचा रंजक प्रवास ‘खाऊ गल्ली’मधून वाचकांना अनुभवता येणार आहे.
या प्रकाशन सोहळ्यास खाद्यसंस्कृती अभ्यासक आणि ‘मुंबई स्वयंपाकघर’ फेसबुक समूहाच्या प्रमुख भक्ती चपळगावकर, लेखिका व खाद्यसंस्कृती संशोधक आरजे रश्मी वारंग तसेच ‘खाने में क्या है’मुळे घराघरात पोहोचलेले खाद्यप्रेमी कुणाल विजयकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना राणे करणार आहेत.
स्वामीराज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला प्रसिद्ध चित्रकार विनय गावडे यांच्या चित्रांनी विशेष आकर्षण प्राप्त झाले आहे. महान चित्रकार मारिओ मिरांडा यांच्या शैलीला अभिवादन करणाऱ्या या चित्रांमुळे पुस्तकाला एक वेगळी दृश्यात्मक ओळख लाभली आहे.
खाद्यसंस्कृती, साहित्य आणि मुंबईच्या बदलत्या जीवनशैलीत रस असलेल्या प्रत्येकाने या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकाशक रजनीश राणे यांनी केले आहे.







