मालवण : (प्रतिनिधी)
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आय.टी.आय.) प्रवेश प्रक्रिया २१ मेपासून सुरू झाली असून दहावी उत्तीर्ण तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मालवणच्या वतीने विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन प्रवेश अर्ज भरावा. अर्ज भरल्यानंतर जवळच्या आय.टी.आय. संस्थेत जाऊन अर्जाची पडताळणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रवेशासाठी व्यवसायांची निवड करता येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतील विविध टप्प्यांची माहिती मिळावी यासाठी संस्थेमार्फत समुपदेशनासह विविध अभ्यासक्रमांबाबत मार्गदर्शनही केले जात आहे.
राज्यातील आय.टी.आय. संस्थांमध्ये एकूण ८३ व्यवसाय उपलब्ध असून सुमारे १ लाख ५५ हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आणि रोजगारक्षमतेला चालना देणारे ६५२ नवीन तुकड्या सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे आहे. तसेच प्रशिक्षणार्थींना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत असून प्रतिमहिना विद्यावेतन योजना तसेच प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना यांचाही लाभ दिला जातो. आय.टी.आय.चा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमानुसार राष्ट्रीय कौशल्य प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मालवण येथे यावर्षी प्रवेशासाठी १३२ जागा उपलब्ध आहेत. संस्थेमध्ये मेकॅनिक डिझेल, वेल्डर, ड्रेस मेकिंग तसेच रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन या चार प्रमुख व्यवसायांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रात तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, आरक्षणनिहाय आणि केंद्रीकृत ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आय.टी.आय. मालवणमध्ये प्रवेश घेऊन रोजगार, स्वयंरोजगार आणि उच्च शिक्षणाच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य बी. जी. सावंत व प्रभारी प्राचार्य यू. जी. खेडेकर तसेच संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी केले आहे.







