मालवण (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्गम आणि दुर्लक्षित गडकिल्ले हे आपल्या इतिहासाचे वैभव आहेत. या ऐतिहासिक वारशाचे महत्त्व ओळखून किल्ले सिद्धगडच्या संवर्धन आणि सुरक्षेसाठी भारतीय जनता पार्टी पूर्णपणे कटिबद्ध असून, या माध्यमातून परिसराचा विकास साधणे शक्य आहे असा विश्वास भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी व्यक्त केला. या किल्ल्याच्या विकासाची निश्चित दिशा ठरवण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, मंत्री आशिष शेलार आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना सविस्तर माहिती देऊन विशेष प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुक्यातील ओवळीये येथील किल्ले सिद्धगड येथे काल ‘शिवराज्याभिषेक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला किल्ले सिद्धगडवर छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘भगवा ध्वज’ अत्यंत अभिमानाने फडकवण्यात आला. यावेळी उपस्थित शेकडो शिवप्रेमींनी दिलेल्या छत्रपतींच्या जयजयकाराच्या घोषणांनी संपूर्ण सिद्धगड आणि आजूबाजूचा परिसर दुमदुमून गेला होता. बाल शिवाजीची आकर्षक वेषभूषा केलेले बालक या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले.
ओवळीये गावच्या सरपंच रंजना पडवळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, किल्ले सिद्धगडवर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन इतक्या भव्य पातळीवर साजरा केला गेल्यामुळे, आता या ऐतिहासिक किल्ल्याचे नाव महाराष्ट्राच्या पटलावर ठळकपणे समोर येत आहे, असा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या ऐतिहासिक सोहळ्याला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेंद्र चव्हाण, माजी उपसभापती राजू परुळेकर, अरुण मेस्त्री, किर्लोस सरपंच साक्षी चव्हाण, हिवाळे सरपंच रघुनाथ धुरी, रामगड सरपंच शुभम मठकर, नांदोस उपसरपंच विजय निकम, पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे, योजना कांबळी, माधुरी मसुरकर, किर्लोस ग्रामपंचायत सदस्य प्रवीण घाडीगावकर, उद्योजक बाबा आंगणे, बंडू गावडे आदी उपस्थित होते.
या सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे किल्ले सिद्धगडचे सरदार वंशज बाळा सावंत यांच्यासह ओवळीये व परिसरातील असंख्य शिवप्रेमी आणि ग्रामस्थ या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







