मालवण (प्रतिनिधी)
शेतकरी बांधवांनी ‘एल निनो’ च्या प्रभावापासून आपल्या शेतीचे नुकसान टाळण्यासाठी सतर्क राहावे. एल निनो मुळे पावसाच्या वेळात आणि वातावरणात बदल होण्याचे संकेत आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी पाण्याचे सुयोग्य नियोजन करून योग्य उपाययोजना केल्यास पिकांचे व उत्पादनाचे नुकसान टाळता येईल, असे प्रतिपादन कोळंब कृषी सेवक विवेक रंगे यांनी व्यक्त केले.
मालवण तालुक्यातील कोळंब ग्रामपंचायत येथे ‘एल निनो’ या वातावरणीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनाची घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पंचायत समिती सदस्या सौ.योजना कांबळी, कोळंब सरपंच सौ. सिया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर, ग्रामसेवक सौ.युती चव्हाण, आरोग्यसेवक श्री. पिंगुळकर आदी उपस्थित होते.
यावेळी कोळंब कृषी सेवक विवेक रंगे यांनी ‘एल निनो’ बाबत माहिती देताना हवामानातील बदल आणि पिकांवर होणारे परिमाण या बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यात भात पीक लागवड तंत्रज्ञान व योग्य वाणाची निवड, ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ बाबत मार्गदर्शन, पीक विविधिकरणचा अंगीकार, फळ किंवा पिकांची घ्यावयाची काळजी,पाण्याचा कार्यक्षम वापर, आणि सेंद्रिय शेती व खत व्यवस्थापन या प्रमुख विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना एल निनो बाबत पिकांची घ्यावयाची काळजी बाबत मार्गदर्शन करणारे पत्रक वितरित करण्यात आले.







