मालवण : भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘विशेष सखोल पुन:रीक्षण’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या बैठकीत राज्यातील नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीत मिळालेल्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने विशेष एसआयआर यंत्रणा राबविण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी दिली.
मुंबईत पार पडलेल्या या बैठकीत मतदार यादी पुनर्रनिरीक्षण प्रक्रियेदरम्यान निर्माण होणाऱ्या अडचणी, मतदार नोंदणीतील त्रुटी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तसेच संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षता राखण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी वरिष्ठ नेते आणि तज्ज्ञांनी विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.
लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा हक्क सुरक्षित राहणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने या प्रक्रियेत बीएलओ म्हणून सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच बीएलओ नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.
जिल्ह्यातील एकही मतदार मतदान प्रक्रियेपासून वंचित राहू नये, यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून जनतेच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी काम करावे, असेही बैठकीत ठरविण्यात आले.
या चर्चासत्राला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेतील गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, तसेच राज्यातील खासदार, आमदार आणि प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अरविंद मोंडकर, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाग, प्रदेश सरचिटणीस तथा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आबा दळवी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.







