मालवण (प्रतिनिधी)
गेले अनेक दिवस हैराण झालेल्या आचरेवासीयांनी आज अखेर वीज वितरण कंपनीविरोधात रुद्रावतार धारण केला. ग्रामस्थांनी आचरा ग्रामस्थांनी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत कार्यालयावर धडक दिली, मात्र तेथे सक्षम अधिकारीच उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना बाहेर काढत वीज कार्यालयाला टाळे ठोकत अधिकाऱ्यांना सोबत घेत बाजारपेठ ते आचरा तिठा असा मोर्चा काढत आचरा तिठा येथे ठिय्या मारत वीज मंडळा विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तब्बल सहा तास सुरु असलेल्या या आंदोलनात उपस्थित अधिकाऱ्यांनी वीज समस्या तातडीने सोडवतो, असे सांगितले. मात्र पुन्हा वीज समस्या निर्माण झाल्यास यापेक्षाही ग्रामस्थांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल असा इशारा ग्रामस्थांनी देत आंदोलन मागे घेण्यात आले.
गेला महिनाभर वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे आधीच हैराण झालेल्या आचरावासियांनी सोमवारी दिवसभर दुरुस्तीच्या नावाखाली खंडित ठेवलेला वीज पुरवठाही ऐन उष्णतेत सहन केला होता. मात्र सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता आचरा परीसरातील काही भागात सुरू झालेला वीजपुरवठा काही काळानंतर पुन्हा खंडित झाला. तो वीजपुरवठा मंगळवारी सकाळपर्यंतही सुरू झाला नव्हता. त्यामुळे सोमवारची रात्र अंधारातच जागून काढलेल्या ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंतच झाला. यामुळे संतप्त आचरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली आचरा बाजारपेठ येथील वीज मंडळ कार्यालयावर धडक दिली. यावेळी वीज समस्या सोडविण्यासाठी तासभर वाट बघूनही सक्षम अधिकारी उपलब्ध झाले नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयच बंद करून टाकले. यानंतर आलेले सहाय्यक अभियंता सौरभ वर्मा, कनिष्ठ अभियंता ओम शिंदे यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्यामागचे कारण काय व्यापाऱ्यांचे नुकसान झाले त्याला जबाबदार कोण? असे प्रश्न विचारत अधिकाऱ्यांना भंडावून सोडले. जोपर्यंत लोकांच्या प्रश्नांवर सक्षम उत्तर देणारा अधिकारी येत नाही तोपर्यंत येथून हलणार नसल्याचा पवित्रा घेत आचरा बाजारपेठ येथील कार्यालयासमोर रस्त्यावरच ग्रामस्थ उभे ठाकले.
यावेळी आलेले आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी कार्यालयाचा दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळी मालवण खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी आक्रमक होत दरवाजा उघडण्यास विरोध केला. आमच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी घेता का ? असा प्रश्न विचारत आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी आम्ही आज मागे हटणार नसल्याचा पवित्रा घेतला. यावेळी प्रभारी चार्ज असलेले देवगड येथील उपकार्यकारी अभियंता लिमकर हे उपस्थित होताच संतप्त ग्रामस्थांनी घेराव घालत त्यांना उन्हातच उभे करत प्रश्नांचा भडीमार सुरु केला. लिमकर हे अनुत्तारित झाल्याने तुम्ही आमच्या समस्यांचे निवारण करत नसाल तर सक्षम अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून घ्या, असे ग्रामस्थांनी सुनावले. यावेळी लिमकर यांनी अधिक्षक अभियंता राख यांना फोनवरून लोकांच्या उद्रेकाची कल्पना दिली. यावेळी आपण मुंबईला मिटींगला जात असून तुम्हाला लेखी हमी देतो असे सांगितले. मात्र संतप्त ग्रामस्थांनी ऐन सिजन मध्येच व्यापारी आणि ग्रामस्थांचे महिन्याभराचे नुकसान झाले, त्याचा खर्च आणि वीज बिल माफ म्हणून लिहून देत असाल तर द्या नाहीतर नको असा आक्रमक पवित्रा घेतला. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना आपल्या सोबत घेत बाजारपेठ ते आचरा तिठा पर्यंत “या विद्यूत मंडळाचे करायचे काय खाली मुंडी वर पाय,विद्यूत मंडळ हाय हाय, ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणाऱ्या मंडळाचा निषेध” आदी घोषणा देत मोर्चा काढला. आचरा तिठा येथे आलेल्या आंदोलकांनी आचरा तिठा येथे भर चौकातच ठिय्या मारत रास्ता रोको केला. यामुळे आचरा तिठा येथे वाहतूक खोळंबाही झाला होता.
याबाबत आचरा पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढून वरीष्ठ विद्यूत अधिकाऱी सचिन म्हेत्रे यांना बोलावून घेत रास्ता रोको थांबविण्याचा प्रयत्न केला. याबाबत सरपंच यांनी पर्यटकांचा आणि वाहनचालकांचा ऐन दुपारी होणारा त्रास लक्षात घेऊन आंदोलकांना समजावून ठिय्या आंदोलन मागे घेतले. मात्र मालवण येथून आलेल्या उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे यांच्याशी आचरा बाजारपेठ कार्यालयात बैठक घेत चर्चेतून समस्या निवारण्याचा प्रयत्न केला. यावेळी विचारलेल्या प्रश्नांना अधिकारी सकारात्मक उत्तर देत नसल्याने तसेच अधिकारी उर्मट उत्तरे देत असल्याचे सांगत ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. वाढता उद्रेक रोखण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न सुरू केला. यामुळे झालेल्या धावपळीत कार्यालयातील लाकडी पार्टीशिअनचे नुकसान झाले.
यादरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी आढाव हे देखील आंदोलन स्थळीदाखल झाले होते. शेवटी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, राजन गांवकर आदींनी समस्या तातडीने मार्गी लावा, नाहीतर यापेक्षा उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा देत आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात सरपंच जेरोन फर्नांडिस, जि. प. सदस्य वर्षा सांबारी, पं.स. सदस्य गणेश तोंडवळकर, उपसरपंच संतोष मिराशी, राजन गांवकर, जयप्रकाश परुळेकर, व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष मंदार सांबारी, ग्रा.प. सदस्य पंकज आचरेकर, चावल मुजावर, अनुष्का गांवकर, किशोरी आचरेकर, श्रूती सावंत, माजी सरपंच मंगेश टेमकर, अभय भोसले, पाडूरंग वायंगणकर, राजन पांगे, चंदू सावंत, अजित घाडी, चंदन पांगे, मंगेश मेस्त्री, विजय कदम,विकास कावले, विकास साटम, नारायण कुबल, शाम घाडी, हर्षद धुरी, शैलेश मुणगेकर, मांगिरीष सांबारी, शंकर मिराशी, नितीन घाडी, विक्रांत आचरेकर,सुरेंद्र कुबल, सचिन गुळगुळे यांसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.







