मालवण (प्रतिनिधी)
भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार ही निवती लाईट हाऊसजवळच्या समुद्रात बुडवून भारतातील पहिला अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ व पाणबुडी प्रकल्प साकारण्यात येत आहे. युद्धनौका समुद्रतळाशी नेण्याची प्रक्रिया सुरु असून समुद्रातळाशी युद्धनौका विसावल्यावर त्यावर कृत्रिम प्रवाळ व फिशिंग नेट तयार होऊन एक समुद्री जैवविविधता निर्माण होईल. येत्या दीड वर्षात पाणबुडीची निर्मिती केल्यानंतर त्याद्वारे पर्यटकांना समुद्रतळाशी नेऊन पाणबुडी व तेथील समुद्री जैवविविधतेचे दर्शन करता येणार आहे. हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आणि पर्यायाने महाराष्ट्र शासनाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा आणि अभिमानाचा ठरणार आहे. या ऐतिहासिक प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवी आणि मोठी दिशा मिळणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटने यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मालवण तारकर्ली येथील इसदा येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटने, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, माझगाव शिपयार्डचे
निपेंद्र निरव, पाणबुडी तज्ज्ञ सुनील कोरटी, एमटीडीसी चे अधीक्षक अभियंता संजय पाटील, एमटीडीसीचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र सोनवणे, एमटीडीसी जलपर्यटन वरिष्ठ व्यवस्थापक क्षिप्रा बोरा, बांधकाम व्यवस्थापक दीपक हरणे, प्रादेशिक अधिकारी, बंदर विभागाचे कॅप्टन संजय उगलमुगले आदी उपस्थित होते.
यावेळी प्रकल्पाविषयी माहिती देताना निलेश गटने म्हणाले, भारतीय नौदलातून सेवानिवृत्त झालेली ८१ मीटर लांबीची ‘एक्स आयएनएस गुलजार’ ही युद्धनौका काल दुपारी विजयदुर्ग बंदरावरून रवाना झाली होती, ती आज सकाळी निवती किनारपट्टीवर निश्चित केलेल्या जागेवर सुरक्षितपणे पोहोचली आहे. १५ डिग्री ५२ मिनिट १८ लॅटिट्युड आणि ७३ डिग्री २९ मिनिट ०६ लॉन्जिट्युड या अचूक भौगोलिक स्थानावर, २२ मीटर खोलीवर ही नौका समुद्र स्थापित केली जात आहे. माझगाव डॉक लिमिटेडच्या तज्ज्ञ अभियंत्यांच्या देखरेखीखाली अत्यंत सायंटिफिक आणि नियंत्रित पद्धतीने जहाजात पाणी भरण्याची प्रक्रिया सुरू असून, आज संध्याकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत ही नौका समुद्राच्या तळाशी स्थिरावेल. कोणतीही जोखीम न पत्करता ही प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.
पुढील १ ते दीड वर्षात समुद्राच्या तळाशी असलेल्या या जहाजावर नैसर्गिकरीत्या विविध कोरल्स (प्रवाळ) आणि ‘फिशिंग नेस्ट’ (माशांची घरटी) तयार होतील. त्यामुळे समुद्राच्या तळाशी जाऊन ‘स्कुबा डायव्हिंग’ करणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक अतिशय सुंदर आणि नयनरम्य ठिकाण ठरणार आहे.
अंडरवॉटर म्युझियमसोबतच माझगाव डॉक लिमिटेडच्या सहकार्याने २४ आसनी अत्याधुनिक पाणबुडी प्रकल्पाची निर्मिती केली जात आहे. या पाणबुडीचे बांधकाम सुरू झाले असून, पुढील सव्वा ते दीड वर्षात ती पर्यटकांसाठी सज्ज होईल. या प्रकल्पाच्या ठिकाणी समुद्रात एक ‘बार्ज’ असेल, जिथे पर्यटकांसाठी एक छोटे रेस्टॉरंट उभारले जाईल. जेटीपासून पर्यटकांना दोन हाय-स्पीड बोटींद्वारे या बार्जवर नेण्यात येईल. तिथून पर्यटक आपल्या वेळेनुसार स्कुबा डायव्हिंग किंवा पाणबुडी सफारीचा आनंद घेऊ शकतील. पावसाळ्याचे ४ महिने वगळता वर्षातील साडेसात ते आठ महिने हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू राहील. भारतीय नौदलाचे २० ते २२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले कमांडर सुनील कोरटी हे या सबमरीन प्रकल्पाचे तांत्रिक नेतृत्व करत आहेत.
केंद्र सरकारच्या २७ जुलै २०२२ च्या धोरणानुसार, मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी ‘आर्टिफिशियल रिप्स’ (कृत्रिम सिमेंट काँक्रीटचे खडक) तयार करण्यावर भर दिला जात आहे. ओडिशा सरकारने अशा प्रयोगातून मत्स्य व्यवसायात मोठे यश मिळवले आहे. सिंधुदुर्गातील या प्रकल्पासाठी गोव्याच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी’ आणि ‘कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी’ कडून पर्यावरणीय अभ्यास पूर्ण करून मंजुरी घेण्यात आली आहे. या प्रकल्पाचे आयुर्मान २०० वर्षांपेक्षा जास्त असून, याच्या अवतीभवती ५०० मीटर क्षेत्रात स्थानिक मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी क्षेत्रबंदी असेल. स्थानिक मच्छीमारांशी सकारात्मक संवाद साधूनच ही प्रक्रिया केली जात आहे. फेरीचे दर आणि वेळापत्रक पुढील वर्षी निश्चित केले जाईल, असे श्री. गटने यांनी सांगितले.
एमटीडीसीच्या आर्थिक स्वावलंबनावर बोलताना निलेश गटने म्हणाले, “महामंडळ हे राज्य शासनाची कंपनी असून ते स्वतःच्या निधीवर चालणे अपेक्षित आहे. शासन केवळ भांडवली खर्चासाठी निधी देते. ऑपरेटिंग खर्च महामंडळाला स्वतः उभा करावा लागतो. सध्या भीमाशंकर प्रकल्पासह राज्यभरातील सुमारे ५० तोट्यातील मालमत्ता सार्वजनिक-खासगी भागीदारी धोरणांतर्गत खासगीकरणातून चालवण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.” जसे एमआयडीसी जागा संपादित करून पायाभूत सुविधा देते आणि उद्योग चालवायला तज्ज्ञ कंपन्यांना देते, तसेच पर्यटन क्षेत्रात अनुकूल वातावरण निर्माण करून व्यावसायिक चालवण्याची जबाबदारी तज्ज्ञांकडे दिली जात आहे, असेही ते म्हणाले.
जिल्ह्यात एमटीडीसीचे विविध प्रकल्प
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एमटीडीसीच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना अंतिम टप्प्यात आहेत. यात १९९४-९५ सालापासून प्रलंबित असलेली भूसंपादनाची प्रक्रिया आणि इतर वाद मिटले असून, प्रसिद्ध ‘ताज ग्रुप’चा भव्य रिसॉर्ट प्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याचे शिरोडा वेळागर येथे काम सुरू होईल. मिठबाव येथील पर्यटन प्रकल्पाचे कामही नजीकच्या काळात सुरू केले जात आहे. केंद्र सरकारच्या ‘डायरेक्ट जनरल ऑफ लाईट हाऊस’शी चर्चा सुरू असून, जिल्ह्यातील ऐतिहासिक दीपगृहांच्या ठिकाणी फेरीबोट आणि पर्यटन सुविधा सुरू केल्या जातील.
पर्यटन क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी राज्य सरकारने ‘डेस्टिनेशन मॅनेजमेंट युनिट’ आणि ‘क्लस्टर मॅनेजमेंट युनिट’ हे नवीन धोरण स्वीकारले आहे. या अंतर्गत ‘तारकर्ली’ हे डेस्टिनेशन मानून तिथले स्थानिक प्रश्न, हॉटेल व्यवस्थापन, नियमावली आणि अंमलबजावणी स्थानिक स्तरावरच सोडवली जाईल. या युनिटमध्ये स्थानिक पत्रकार आणि भागधारकांचा समावेश असेल. विशेष म्हणजे, या नाविन्यपूर्ण धोरणासाठी ‘सिंधुदुर्ग’ जिल्ह्याची पायलट जिल्हा म्हणून निवड करण्यात आली असून, याच्या धोरण निर्मितीला सुरुवात झाली आहे, असेही श्री. गटने म्हणाले..
जिल्ह्यासाठी अभिमानास्पद प्रकल्प – जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या, तारकर्ली हे देशातील एक अत्यंत महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून आधीच नावारूपास आले आहे. मात्र, ‘एक्स आयएनएस गुलदार’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे येथील पर्यटनाचा दर्जा थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचेल. हा प्रयोग केवळ सिंधुदुर्ग किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता, देशातील इतर पर्यटन राज्यांसाठी एक आदर्श ‘पायलट प्रोजेक्ट’ ठरेल. या ऐतिहासिक आणि पहिल्यावहिल्या प्रयोगाचे आपण ‘प्रथम पाईक’ असणार आहोत, याचा जिल्हा प्रशासकीय प्रमुख म्हणून मला सार्थ अभिमान आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मालवण-तारकर्ली परिसराला निसर्गाने समृद्ध किनारपट्टी दिली असून, स्कूबा डायव्हिंग आणि जलपर्यटनात या भागाचे देशात वेगळे स्थान आहे. आता यात ‘एक्स आयएनएस गुलदार’ या नौदलाच्या निवृत्त युद्धनौकेच्या माध्यमातून एका आगळ्यावेगळ्या आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची भर पडत आहे. या प्रकल्पाकडे जिल्हा प्रशासन अत्यंत सकारात्मक आणि पर्यटनाला गती देणारा प्रकल्प म्हणून पाहत आहे. यामुळे स्थानिक पर्यटनाची व्याप्ती वाढून जागतिक पातळीवरील पर्यटक सिंधुदुर्गकडे आकर्षित होतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
हा अनोखा प्रयोग निवतीच्या समुद्रात यशस्वी झाल्यानंतर, देशातील इतर किनारपट्टी लाभलेली राज्ये याकडे एक आदर्श मॉडेल म्हणून पाहतील. पर्यटनाला एक नवी आणि शाश्वत दिशा देण्याचे काम या माध्यमातून होणार आहे. या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि देशात पहिल्यांदाच होत असलेल्या प्रयोगाची सुरुवात आपल्या जिल्ह्यातून होत आहे. या क्रांतीकारी बदलाचे प्रथम पाईक होण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला मिळत आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. असे श्रीमती धोडमिसे यांनी स्पष्ट केले.
या प्रकल्पामुळे केवळ पर्यटनाचा दर्जाच सुधारणार नाही, तर जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक, होमस्टेधारक, स्थानिक मार्गदर्शक आणि नौका व्यावसायिक यांच्यासाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.







