सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात प्रचंड रंगत आली असून २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होत असल्याने राजकीय वातावरण चुरशीचे झाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी — दोघांनीही येथे स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतल्याने स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे.
भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी श्रद्धाराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच सर्वच प्रभागांमध्ये भाजपची दावेदारी अधिक आक्रमक झाली आहे. शेवटच्या टप्प्यात भाजपने संघटनात्मक ताकद, दांडगा जनसंपर्क, आणि घराघरात पोहोचणारी मोहीम उभारल्याने प्रत्येक मतदारसंघात भाजप उमेदवारांचा प्रभाव लक्षणीय वाढला असल्याचे चित्र आहे.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा प्रभावी संवाद आणि युवा नेते विशाल परब यांच्या करिष्म्यामुळे भाजपकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा ओढा वाढल्याचे दिसून येत आहे. यामुळे भाजपची मोहिम शेवटच्या दिवसांत अधिक जोमात गेली आहे.
श्रद्धाराजे भोसले यांच्या आश्वासक नेतृत्वामुळे सावंतवाडीकरांनी पुन्हा एकदा सावंतवाडी राजघराण्याच्या विश्वासार्हतेला पसंती देण्याचे संकेत मिळत आहेत.
दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) कडून नीता कविटकर सावंत नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात असून, संजू परब यांच्या नेतृत्वाखाली पक्ष सर्व प्रभागात विजयासाठी आक्रमक प्रचार करत आहे.
तथापि, शेवटच्या टप्प्यात शिवसेनेच्या गोटातून आलेल्या काही विधानांमुळे आणि संजू परब यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाला फटका बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. काही प्रभागांमध्ये अंतर्गत नाराजीही वाढल्याचे वृत्त आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेसलाही संघटनात्मक अडचणींमुळे दमछाक होताना दिसत आहे.
या निवडणुकीत काही विरोधकांकडून सोशल मीडियावर तयार केलेल्या फेक नॅरेटिव्हबद्दल नागरिकांमध्ये स्पष्ट नाराजी असल्याचे मतदारांच्या प्रतिसादावरून दिसून आले आहे. जनतेचा कल मुद्देसूद चर्चेकडे असून, विकासाचे आश्वासन आणि विश्वसनीय नेतृत्व यांनाच प्राधान्य मिळत आहे.
सावंतवाडीत सौ. श्रद्धा सावंत भोसले प्रचारात आघाडीवर असून भाजपकडून या निवडणुकीत विजयी मोहीम राबवली जात असल्याचा दावा करण्यात येत आहे.
वाढता जनसंपर्क, नेतृत्वाचा प्रभाव आणि संघटनात्मक ताकद यामुळे भाजपने या निवडणुकीत निर्णायक आघाडी घेतल्याचा पक्षाचा दावा आहे.







