मालवण (प्रतिनिधी)
तोंडवळी ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये नायब तहसीलदार व महसूल अधिकारी यांच्या समक्ष वाळू उपसा विरोधात ठराव घेतलेला असतानाही प्रत्यक्षात तोंडवळी गावातील लोकप्रतिनिधींच्या संमतीने व सहभागाने तोंडवळी तळाशील गावातील खाडी पात्रामध्ये सध्या पंचवीस ते तीस बोटिंद्वारे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा सुरु आहे, असा आरोप रेवंडी ग्रामस्थानी करत या वाळू उपशावर कारवाई करावी अशी मागणी मालवण तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रेवंडी येथील ग्रामस्थानी आज मालवण तहसील कार्यालयात नायब तहसीलदार जांभेकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी रेवंडीचे सरपंच अमोल वस्त, ग्रा. पं. सदस्या मेघना कांबळी, युवराज कांबळी, दिलीप मोर्वेकर, सचिन मोर्वेकर, विजय कांबळी, प्रसन्न कांबळी, भावेश कांबळी, संतोष मुणगेकर, प्रसाद कांबळी, मिलिंद कांबळी, विनायक कांबळी, प्रितेश मयेकर, शामराव कांबळी, अनिरुद्ध पोयरेकर आदी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
कालावल खाडीतील वाळू उपसा थांबविण्यासाठी तळाशील ग्रामस्थ ज्या ठिकाणी उपोषणास बसले होते त्या तळाशील येथील श्रीकृष्ण मंदिरा नजीकच्या ठिकाणाजवळ शासनाचा बंधारा फोडून तेथे जेसीबीच्या सहाय्याने वाळू उत्खनन चालू आहे. त्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी रेवंडी ग्रामस्थांनी केली. तोंडवळी ग्रामपंचायत मार्फत वाळू उपसा बंदीचा ठराव चुकीच्या पद्धतीने मंजूर झाला असून शासनाची फसवणूक करून शासनाला फक्त दिखावा करून दाखवण्यासाठी हा ठराव घेतलेला आहे, असा आरोप रेवंडी ग्रामस्थांनी केला.
तळाशील येथील वाळू उपसा होणाऱ्या ठिकाणी तात्काळ पंचनामा करून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या व्यक्तींची वाळू उपसा कायम थांबवण्यात यावी. वाळू उपसा करणाऱ्या व्यक्तींची वापरात असलेली बोट / यंत्रसामग्री जप्त करण्यात यावी. शासकीय बंधारा वाळू उपसा करण्यासाठी तोडलेला असून, त्यामुळे होणारी नुकसानी संबंधितांकडून वसूल करावी व संबंधीत कारवाई करावी. कांदळवन तोडलेले असल्यामुळे CRZ अधिसूचना २०१९ नुसार कांदळवन क्षेत्र हे CRZ 1-IA नुसार सर्वात संवेदनशील असल्याने त्यांच्यावर पर्यावरण सर्वेक्षण कायदा १९८६ व इतर तरतुदी नुसार संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करावेत, अशा मागण्या यावेळी रेवंडी ग्रामस्थांनी केल्या






