मालवण : (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा समिती यांच्या निर्देशानुसार दिवाणी न्यायालय (क.स्तर), मालवण येथे दि. ९ मे रोजी सकाळी १० वा. ‘राष्ट्रीय लोकअदालत आयोजित केली आहे. तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही लोकअदालत पार पडणार आहे.
दिवाणी न्यायालयात प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच सर्व राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, स्वायत्त संस्था, ग्रामपंचायतींकडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी ही लोकअदालत उपयुक्त आहे. प्रकरणे तडजोडीने मिटवायची आहेत, त्यांनी तालुका विधी सेवा समिती, मालवण कार्यालयाकडे दाखल करावीत. तसेच, प्रकरणे चर्चेद्वारे मिटवायची असतील, त्यांनी न्यायालयात हजर राहून लोकअदालतीस सहकार्य करावे, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश (क.स्तर), मालवण तथा तालुका विधी सेवा समिती, मालवणचे अध्यक्ष एम. के. फकिह यांनी केले आहे.







