मालवण (प्रतिनिधी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या शरीराची, कुटुंबाची पर्वा न करता बहुजन समाजाला प्रकाशात आणण्याचे काम केले. बाबासाहेब यांचे वारसदार म्हणून आपण काय करतोय याचा विचार आपण केला पाहिजे. बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार संघर्ष करायला व ज्ञान मिळवायला शिकले पाहिजे, असे, प्रतिपादन राष्ट्र सेवादल कोल्हापूरचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. बाबासाहेब नदाफ यांनी येथे बोलताना केले.
मालवण मधील फुले शाहू आंबेडकर विचारमंच या संघटनेतर्फे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा झाला. यानिमित्त सकाळी समाजमंदिर मालवण येथे पूजापाठ झाल्यावर समाजमंदिर एस.टी. स्टैंड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक बांगीवाडा मालवण अशी भव्य धम्मरॅली काढण्यात आली.
धम्मरॅलीनंतर मामा वरेरकर नाट्यगृह येथे जाहीर सभा संपन्न झाली. या सभेचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. बाबासाहेब नदाफ, प्रमुख पाहुणे स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. कैलास राबते, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष रंजन तांबे यांच्यासह नाटककार, लेखक डॉ. श्रीकांत धारपवार, माजी गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, नगरसेवक व मागासवर्गीय कल्याण समिती सभापती सिद्धार्थ जाधव, नगरसेविका तथा आरोग्य सभापती पूनम चव्हाण, शुभांगी पवार, प्रा. नागेश कदम, सेवानिवृत्त नायब तहसीलदार व विचारमंचचे सचिव आनंद मालवणकर, महिला विभाग अध्यक्षा सौ. माधुरी जाधव आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. मिलिंद जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवक युवतींचा तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रा. नदाफ यांनी मार्गदर्शन केले. प्रा. राबते, डॉ. धारपवार, पूनम चव्हाण, सिद्धार्थ जाधव यांनीही विचार मांडले. सिद्धार्थ जाधव व पूनम चव्हाण यांनी आपल्या भाषणात प्रभाग क्रमांक चार मध्ये भव्य समाज मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात रंजन तांबे यांनी फुले शाहू आंबेडकर विचारमंचला मारक ठरणाऱ्या गोष्टी बाजूला केल्या पाहिजेत, तसेच तरुणांनी या चळवळीत सहभागी झाले पाहिजे, असे सांगितले. सूत्रसंचालन डी. डी. जाधव यांनी केले तर आभार गुळवे यांनी मानले.
यानंतर दुसऱ्या सत्रात लोकशाहीर सदाशिव निकम कोल्हापूर यांचा शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचा पुरोगामी जलसा कार्यक्रम सादर झाला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.







