मुंबई, दि.६ : ग्रामीण महाराष्ट्राच्या कष्टाचा सुगंध, कष्टकरी माऊलींच्या हाताची जादू आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड यांचा अभूतपूर्व महोत्सव नवी मुंबईच्या वाशी येथे पार पडला. २४ मार्चपासून सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस-२०२६’ प्रदर्शनाने निरोप घेताना यशाचे सर्व विक्रम मोडीत काढले. १३ दिवसांत तब्बल २२ कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक विक्री करून ग्रामीण महिलांनी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये उद्योजकतेचा नवा इतिहास लिहिला.
मुंबईकरांनी ४९० स्टॉल्सवर दाखवलेला हा उदंड प्रतिसाद केवळ खरेदीपुरता मर्यादित नव्हता तर तो ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलेला एक भक्कम आधार ठरला. शेवटचे सहा दिवस तर प्रदर्शनात जनसागराचा महापूर लोटला, ज्यामुळे आयोजकांनाही प्रदर्शनाचा कालावधी वाढवावा लागला.
यंदाच्या प्रदर्शनाचे सर्वात मोठे ‘गेमचेंजर’ ठरले ते म्हणजे आयोजकांनी पुरवलेल्या नाविन्यपूर्ण सुविधा. २५ किलोमीटरच्या परिघात मोफत घरपोच सेवा देण्याचा निर्णय महत्वाचा ठरला. आमच्या हातात पिशव्यांचे ओझे नको, असे म्हणणाऱ्या मुंबईकरांनी या सुविधेमुळे पोतीभरुन धान्य, मसाले, सेंद्रिय गुळ आणि हस्तकलेच्या वस्तूंची मनमुराद खरेदी केली. घरपोच सुविधेमुळे खरेदीचा वेग वाढला आणि उलाढालीने १० कोटींचा टप्पा ओलांडून थेट २२ कोटींवर झेप घेतली.







