मालवण, दि प्रतिनिधी :
मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत सुकळवाड आणि प्रेरणा फाउंडेशन, येडेनिपाणी (ता. वाळवा, जि. सांगली) यांच्या संयुक्त विद्यमाने आज सुकळवाड येथे शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय आणि जिल्हा परिषद केंद्र शाळा सुकळवाड येथे सौर ऊर्जा युनिट कार्यान्वित करून त्याचे यशस्वी उद्घाटन करण्यात आले.
दिवसेंदिवस वाढणारी विजेची मागणी आणि भविष्यातील इंधनाची टंचाई लक्षात घेता सौर ऊर्जेचा वापर हा एक उत्तम पर्याय ठरत आहे. सुकळवाड ग्रामपंचायतीने सौर ऊर्जेचा अवलंब करून विद्युत बिलाचा खर्च कमी करण्यासोबतच पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या आणि शाळेच्या तिजोरीवर पडणारा विजेचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
या उद्घाटन समारंभाला गावातील प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेतृत्व प्रभारी सरपंच किशोर पेडणेकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य जानकी पावसकर, वृषाली गरुड, माजी पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे, माजी उपसभापती प्रसाद मोरजकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील पाताडे, मुख्याध्यापक श्री. नांदोसकर, समिती सदस्य हेमंतकुमार पाताडे, प्रदीप पाताडे, पंढरी पाताडे, किरण पाताडे, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती वेदिका गोसावी, ग्रामपंचायत कर्मचारी अक्षय पाताडे, केंद्रचालक रूपाली बिलये, अंगणवाडी सेविका श्रीमती संजना कुशे आणि सफाई कर्मचारी सुभाष म्हसकर, ग्रामस्थ सागर कुशे, सौ. धामापूरकर, भूषण पाताडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
सौर ऊर्जा वापरामुळे जास्तीत जास्त विद्युत ऊर्जेची बचत करणे शक्य होणार आहे. “नजीकच्या काळात इंधनाची कमतरता भासणार आहे, अशा वेळी सौर ऊर्जा हाच पर्यावरणासाठी सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर मार्ग ठरेल,” असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. सुकळवाड ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे.







