मालवण, दि प्रतिनिधी :
भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आणि कोकणाचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस हे दोन्ही औचित्य साधून मालवण तालुक्यात ६ ते १० एप्रिल या काळात विविध सेवाभावी आणि रचनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या नियोजनासाठी भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालवण येथील भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, दाजी सावजी, पंकज सादये, जीवन भोगावकर, भाई कासवकर, पालिकेच्या गटनेत्या अन्वेशा आचरेकर, महिमा मयेकर, रश्मी लुडबे, अमिता निवेकर, महानंदा खानोलकर, संतोषी कांदळकर, उपसभापती श्याम झाड यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
चिंदरकर पुढे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त पक्षाच्या धोरणाप्रमाणे मालवण तालुक्यातील प्रत्येक बूथवर भाजपचा झेंडा लावला जाणार आहे. यासाठी विभागवार बैठकांचे नियोजन पूर्ण झाले असून, प्रत्येक बूथ स्तरावर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. ६ एप्रिल ते १० एप्रिल या पाच दिवसांच्या कालावधीत स्वच्छता मोहीम, वृक्षलागवड आणि अन्नदान यांसारखे सामाजिक उपक्रम राबवून हा उत्सव साजरा केला जाईल.
नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवणमध्ये गेल्या वर्षाप्रमाणेच याही वर्षी राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी यांसह अन्य जिल्ह्यांतील संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या नियोजनाची जबाबदारी बाबा परब आणि ललित चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
तालुक्यातील काही ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपची भूमिका स्पष्ट करताना चिंदरकर म्हणाले की, “निवडणुकांमुळे गावात गट-तट किंवा वाद निर्माण होऊ नयेत, ही आमची भावना आहे. त्यामुळे शक्य तिथे राजकीय पक्षाचा झेंडा न आणता ‘गाव पॅनल’च्या माध्यमातून निवडणुका बिनविरोध किंवा समन्वयाने व्हाव्यात, अशा सूचना स्थानिक कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. शांततेत आणि गावच्या विकासासाठी या निवडणुका पार पडाव्यात, हाच भाजपचा प्रयत्न राहील.”
मतदार याद्यांच्या पुनर्रचना कार्यक्रमांतर्गत आता नवीन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या मोहिमेत भाजपचे बीएलओ सक्रिय सहभाग घेणार आहेत. याद्यांमधील त्रुटी दूर करून जास्तीत जास्त तरुण मतदारांची नोंदणी मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याच काळात पक्षाची नवीन सदस्य नोंदणी मोहीमही अधिक तीव्र केली जाणार असल्याचे चिंदरकर यांनी नमूद के







