मालवण (प्रतिनिधी)
मालवण शहरातील मेढा येथील शंकर मंदिराकडे जाणाऱ्या गल्लीतील काँक्रीटची लादी तुटल्याने या मार्गांवरून ये – जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली होती. याबाबत स्थानिक नगरसेविका मेघा सावंत यांचे नागरिकांनी लक्ष वेधल्यावर नगरसेविका मेघा सावंत यांच्या माध्यमातून तुटलेल्या लादीच्या जागी नवीन काँक्रीट लादी बसविण्यात आली आहे.
मेढा येथील शंकर मंदिराकडे जाणाऱ्या गल्लीतील (संतोष धूरत यांच्या घरामागे) काँक्रीट लादी सहा महिन्यापूर्वी तुटली होती. यामुळे खड्डा निर्माण होऊन स्थानिक नागरिकांना या गल्लीतून पायी ये – जा करणे तसेच दुचाकी नेणे मुश्किल बनले होते. तसेच शंकर मंदिरात जाणारे भाविकही या गल्लीमार्गे जात असतात. त्यामुळे तुटलेल्या लादीच्या खड्ड्यामुळे अपघाताचीही भीती निर्माण झाली होती. याबाबत नागरिकांनी नगरसेविका मेघा सावंत यांचे लक्ष वेधून दुरुस्तीची मागणी केली होती. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन मेघा सावंत यांनी तुटलेल्या लादीच्या जागी नवीन काँक्रीट लादी बसवून घेतली. यामुळे नागरिकांना या गल्लीतून ये- जा करणे सुकर बनले असून याबद्दल नागरिकांनी नगरसेविका मेघा सावंत यांचे आभार मानले आहेत.







