Fishermen in Malvan demand government intervention as diesel prices surge sharply, threatening the fishing industry during peak season.
मालवण (प्रतिनिधी)
आखाती भागात सुरु असलेल्या युद्धामुळे औद्योगिक डिझेलचे दर वाढले असून तेल कंपन्यांकडून मच्छिमार सहकारी संस्थांना देण्यात येणाऱ्या डिझेलच्या दरात वाढ करण्यात आल्याने मच्छिमारी व्यवसाय संकटात आला आहे, त्यामुळे याबाबत मत्स्य व्यवसाय विभागाने लक्ष घालून डिझेल दरवाढीची परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी मालवण दांडी येथील श्री रामेश्वर मच्छिमार सहकारी संस्थेने मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मत्स्यव्यवसाय खात्याकडून शासकीय डिझेल कोट्यामार्फत मच्छिमार संस्थेच्या सभासदांसाठी विक्रीकर मुक्त डिझेल वितरीत करण्यात येते. यामध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड व हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीकडून मच्छिमार संस्थेस डिझेल पुरवठा करण्यात येतो. युद्धाच्या प्रभावाने ऐन मच्छिमारीच्या हंगामात अचानकपणे या दोन्ही कंपनीकडून डिझेलचा दर वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले. दि. १९ मार्च पर्यंत डिझेल दर रु. ९५ प्रती लीटर एवढा होता तर दि. २० मार्च पासून ११५ रु. प्रती लीटर एवढा झाला आहे. मच्छिमार सहकारी संस्था या बल्क सेल या वर्गीकरणात असून बल्क सेलमधील डिझेलचा दर वाढवलेला आहे. परंतु पेट्रोल पंपावरील किरकोळ विक्रीतील पेट्रोलचा दर रु. ९२.५० प्रती लीटर एवढा आहे.
मच्छिमारी संस्था फक्त डिझेल पुरवठ्यावर अवलंबून आहेत, डिझेल दरवाढीमुळे आमचा उत्पन्नांचा मार्ग बंद झाला आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर नौका मालकांना आपला व्यवसाय बंद करावा लागेल. जे काही मोजकेच नौका ट्रालिंग व्यवसाय करतात त्यांचा पण व्यवसाय संपुष्टात येईल. डिझेल पुरवठा बंद झाल्यास मच्छिमार व्यवसायावर अवलंबून असणारे जोड व्यवसायही बंद होणार आहे. ऐन मच्छिमारीच्या हंगामात या व्यवसायावर संकट उभे राहिले आहे, असे रामेश्वर मच्छिमार संस्थेने म्हटले असून या सर्व गोष्टींचा विचार मत्स्य विभागाने वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन उद्भवलेली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, याबाबत पालकमंत्री व मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांचेही लक्ष वेधणार असल्याचे रामेश्वर मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष जगदीश खराडे यांनी सांगितले.







