Sindhudurg Renewable Energy Association has been formed on the auspicious occasion of Gudi Padwa, bringing together solar professionals to boost renewable energy development and coordination in the district.
मालवण, प्रतिनिधी :
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोलर क्षेत्रात कार्यरत व्यावसायिकांनी एकत्र येत “सिंधुदुर्ग रिन्यूएबल एनर्जी असोसिएशन”ची अधिकृत स्थापना केली आहे. जिल्ह्यातील रिन्यूएबल एनर्जी क्षेत्राला चालना देण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
कुडाळ येथे झालेल्या बैठकीत या असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी आशिष कोरगावकर, सचिवपदी किशोर दाभोलकर तर खजिनदारपदी बाळकृष्ण सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीस प्रवीण सावंत, श्रीपाद खोबरेकर, लतेश चोपडेकर, सिद्धेश मोबारकर, विशाल साटम, आशुतोष पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध भागांतून सोलर क्षेत्रातील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिन्यूएबल एनर्जी क्षेत्राचा शाश्वत व सर्वांगीण विकास साधणे, सोलर व्यावसायिकांमध्ये समन्वय आणि सहकार्य वाढविणे, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध ऊर्जा योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संघटित पद्धतीने काम करण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी खजिनदार बाळकृष्ण सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.







