Malvan Deputy Chief Officer Deepak Patkar initiates repair of old gate valves to stop water wastage and improve supply under the Dhamapur water scheme.
मालवण, प्रतिनिधी :
मालवण शहरातील नळपाणी योजनेतून होणारा पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी पुढाकार घेत गेटव्हॉल्व दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. सुमारे ३० वर्षांपूर्वी बसविण्यात आलेले गेटव्हॉल्व नादुरुस्त झाल्याने पाणीपुरवठ्यात अडचणी निर्माण होत होत्या.
धामापूर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कुंभारमाठ येथील पाणी साठवणूक टाकीजवळील मुख्य वाहिनी तसेच शहरातील विविध उपवाहिन्यांवरील गेटव्हॉल्व खराब झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पाटकर यांनी तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले. देऊळवाडा-आडारी रोड येथील गेटव्हॉल्व दुरुस्तीचा शुभारंभ त्यांनी स्वतःच्या खर्चातून केला.
या कामासाठी जेसीबी आणि नगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली. ठेकेदार श्री. नाईक यांना प्रत्यक्ष ठिकाणी नेऊन खराब गेटव्हॉल्व दाखविण्यात आल्यानंतर दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
या उपक्रमामुळे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात कमी होणार असून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. पाटकर यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दरम्यान, शहरातील बांगीवाडा नाका, धुरीवाडा, कोतेवाडा, रेवतळे, राजकोट, कचेरी रोड, मेढा, नगरपालिका वसाहत, भरड दत्त मंदिर परिसर तसेच कुंभारमाठ GSR टाकी आणि देऊळवाडा येथील गेटव्हॉल्वही टप्प्याटप्प्याने दुरुस्त करण्यात येणार असल्याची माहिती पाटकर यांनी दिली.







