मालवण (प्रतिनिधी)
आचरा ग्राम महसूल विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’त देवस्थान इनाम जमिनीबाबत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. हे शिबिर २५ मार्च रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आचरा विभागातील पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार गणेश लव्हे यांना निवेदन देत या विषयांवर चर्चा करण्याबाबत पूर्वसूचना दिली आहे.
ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मालवण तहसील कार्यालयात तहसीलदार गणेश लव्हे यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी आचरा गावचे माजी सरपंच मंगेश टेमकर, विभागप्रमुख समीर लब्दे, शाम घाडी, माणिक राणे आदी उपस्थित होते.
निवेदनात नमूद केल्यानुसार, आचरा गावातील देवस्थान इनाम जमिनीच्या नोंदींबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. १९७४ साली नायब तहसीलदारांकडून कोणतीही पूर्वसूचना न देता संपूर्ण आचरा व गाऊडवाडी महसुली गावातील जमिनींमध्ये श्री देव रामेश्वराची नोंद करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. ही नोंद नेमक्या कोणत्या कागदपत्रांच्या आधारे करण्यात आली, याबाबत खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच भविष्यात प्रस्तावित सागरी महामार्गासाठी होणाऱ्या भू-संपादन प्रक्रियेदरम्यान मोबदला कोणाला आणि किती मिळणार, याबाबतही स्पष्टता मागण्यात आली आहे. सध्या जमिनींवर कुळ, वरिष्ठ कब्जेदार आणि कनिष्ठ कब्जेदार असे तीन मालक असल्याने याबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
याशिवाय, गाव नमुना क्रमांक ३ ची २००५ मध्ये करण्यात आलेली नोंद कोणत्या आधारे आहे, तसेच एलिनेशन रजिस्टर, सनद, बोटखत आदी कागदपत्रांमध्ये सर्व्हे नंबरची स्थिती काय आहे, याबाबतही तहसीलदारांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्यात येणाऱ्या अडचणींबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, त्यासाठी जबाबदार कोण, याचाही खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच ३८५ एकर जमीन शासनाच्या नावावर दाखवण्यात आल्याबाबतही स्पष्टता मागण्यात आली आहे.
दरम्यान, शिबिरादरम्यान होणारी चर्चा सर्व ग्रामस्थांना स्पष्टपणे ऐकू जावी यासाठी साऊंड सिस्टीमची व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या शिबिराकडे आता आचरा परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.







