हिवाळे येथे खडीची वाहतूक करणाऱ्या डंपरचा भीषण अपघात झाल्याची घटना आज समोर आली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव डंपरने सर्विसिंग सेंटरसमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी तत्काळ घटनास्थळी जमा होत डंपरची वाहतूक रोखून धरली. तब्बल चार तास ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
ग्रामस्थांनी आरोप केला की, या मार्गावरून खडीची ओव्हरलोड वाहतूक सातत्याने सुरू असून त्यामुळे अपघातांची शक्यता वाढत आहे. “जोपर्यंत ओव्हरलोड वाहतूक पूर्णपणे बंद होत नाही, तोपर्यंत रस्ता मोकळा करणार नाही,” असा इशारा ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला दिला.
घटनेची माहिती मिळताच आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, मंडळ अधिकारी संतोष गुरके तसेच हिवाळे आणि ओवळीये गावचे ग्रामस्थ व स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.







