कोकणशक्ती – वेंगुर्ला : प्रतिनिधी
वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड पंचक्रोशीतील जागृत मानल्या जाणाऱ्या श्री देव खरोबा देवस्थान येथे सोमवार, दि. ३० मार्च २०२६ रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या पूजेला परिसरातील भाविकांमध्ये विशेष महत्त्व असून दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने ही पूजा संपन्न केली जाते.
या देवस्थानातील महापूजा ‘साखरेची पूजा’ म्हणून प्रसिद्ध आहे. भाविक आपली मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून देवाला नवस म्हणून साखर अर्पण करतात. नवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा देवदर्शन घेऊन साखर अर्पण करण्याची प्रथा येथे प्रचलित आहे.
भक्तांच्या हाकेला धावून येणारा देव अशी श्री देव खरोबांची ख्याती असून या देवस्थानावर भाविकांची मोठी श्रद्धा आहे. त्यामुळे दरवर्षी या महापूजेच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात.
विशेष म्हणजे केवळ स्थानिकच नव्हे तर गोवा, मुंबई आणि पुणे आदी ठिकाणांहूनही अनेक भाविक दर्शनासाठी येतात.
यंदाही महापूजेच्या निमित्ताने परिसरात धार्मिक वातावरण निर्माण होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे.







