मालवण (प्रतिनिधी)
मालवण मेढा येथील चौकचार मांड येथे चौकचार मित्रमंडळाच्या वतीने आयोजित वार्षिक मांड उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.
मांड उत्सवानिमित्त चौकचार मांड घुमटी आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने सजविण्यात आली होती. याठिकाणी दिवसभर भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. तर रात्री वाडेकरी मंडळींनी सामूहिक गाऱ्हाणे घातल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. यावेळी प्रारंभी पारंपारिक पद्धतीने कलावंतीणींचे गायन व घुमट वादन सादर झाले. त्यास सुधीर गोसावी व प्रफुल्ल गोसावी यांची संगीतसाथ लाभली. त्यानंतर स्थानिक कलाकारांचे रेकॉर्ड डान्स सादर झाले. त्यानंतर शंकर मंदिर मेढा महिला मंडळाचा रंगमेळा हा नृत्य कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये महिलांनी सादर केलेले टाळ नृत्य, लेझीम नृत्य व तुळशी नृत्याला रसिकांची वाहवा मिळाली.
यावेळी चौकचार मित्रमंडळाचे अध्यक्ष यशवंत मेथर, बाळू तारी, लक्ष्मण प्रभू, आपा मोरजकर, राजा गावकर, संतोष पराडकर, विनायक मोरजकर, राजू वाघ, अभय कदम, बाळा आढाव, भूषण मेतर, नितेश पेडणेकर, अजित शेलटकर आदी व इतर वाडेकरी उपस्थित होते.
मांड उत्सवानिमित्त शुक्रवार दि. १३ मार्च रोजी रात्री ९ वा. वाडवळ भोजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चौकचार मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.







