मालवण (प्रतिनिधी) :
मालवण शहरातील वायरी परिसरात शौचालयाच्या उघड्या टाकीत पडलेल्या गाईला बजरंग दल कार्यकर्ते, मालवण नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी तसेच प्राणीमित्रांच्या संयुक्त प्रयत्नातून सुखरूप बाहेर काढत जीवदान देण्यात आले. या धाडसी बचावकार्यात स्थानिकांनीही तत्पर सहकार्य केले.
वायरी येथे सुरू असलेल्या शौचालयाच्या कामामुळे उघडी ठेवण्यात आलेल्या टाकीत गाय पडल्याची माहिती आज पहाटे सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा खोत यांना मिळाली. त्यांनी तात्काळ बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना याबाबत कळवून मदतीसाठी पाचारण केले. माहिती मिळताच बजरंग दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, गायीला बाहेर काढण्यासाठी मालवण नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही मदतीसाठी बोलावण्यात आले. सर्वांनी संयुक्तरीत्या प्रयत्न करत दोराच्या सहाय्याने गायीला सुरक्षितरीत्या टाकीतून बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत गायीला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
या बचावकार्यात बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक श्रीराज बादेकर, प्राणीमित्र आनंद बांबर्डेकर, अमित भगत यांच्यासह नगरपालिकेचे स्वच्छता मुकादम आनंद वळंजू, कर्मचारी बाबू कोळंबकर, नवनाथ परब, रितेश परब, समीर कसले, विजय काळसेकर, सदा मालवणकर, यश घाडी, मंदार तांडेल, लोकेश वायंगणकर आदींनी सहभाग घेतला. बचावकार्य यशस्वी पार पडल्याबद्दल श्रीराज बादेकर यांनी सर्व सहकार्यकर्त्यांचे आभार मानले.
दरम्यान, मालवण शहरात मोकाट जनावरांची वाढती संख्या पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरली आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.







