मालवण दि प्रतिनिधी
क्रीडा सवलत गुणांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी एप्रिल महिन्यापर्यंत मुदतवाढ द्यावी आणि कॅरम, टेबल टेनिस, बुद्धिबळ व बॅडमिंटन या खेळांबाबत होत असलेली तफावत दूर करून त्यांना सांघिक खेळाचा दर्जा द्यावा, अशी ठाम मागणी सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसुळ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे राज्य फेडरेशन प्रतिनिधी अशोक गिते उपस्थित होते.
सध्या क्रीडा गुण सवलतीसाठी प्रस्ताव सादर करण्याची मुदत मर्यादित असल्याने अनेक शाळांना आवश्यक कागदपत्रे, स्पर्धांचे निकाल व प्रमाणपत्रे वेळेत सादर करण्यात अडचणी येत आहेत. परिणामी पात्र आणि मेहनती विद्यार्थ्यांना अन्याय सहन करावा लागतो. एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिल्यास सर्व शाळांना योग्य संधी मिळेल आणि एकही गुणवंत खेळाडू प्रशासकीय कारणांमुळे वंचित राहणार नाही, असे निवेदनात नमूद करून पुढे म्हटले आहे की, याचबरोबर कॅरम, टेबल टेनिस, बुद्धिबळ आणि बॅडमिंटन या खेळांमध्ये प्रत्येक संघात पाच खेळाडूंचा सहभाग असतानाही क्रीडा गुण सवलत देताना फक्त प्रथम तीन खेळाडूंनाच लाभ दिला जातो, ही विसंगती दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रत्यक्षात हे खेळ वैयक्तिक कौशल्याबरोबरच संघभावना, नियोजन, समन्वय आणि सामूहिक प्रयत्न यांवर आधारलेले असतात. बुद्धिबळ विद्यार्थ्यांची विचारशक्ती, दूरदृष्टी आणि निर्णयक्षमता विकसित करते; टेबल टेनिस चपळाई व एकाग्रता वाढवतो; बॅडमिंटन सहनशक्ती आणि मानसिक ताकद घडवतो; तर कॅरम लक्ष केंद्रीकरण व संयमाची शिदोरी देतो. या सर्व खेळांमध्ये संघरचना असताना केवळ काही खेळाडूंनाच सवलत देणे हे खेळाडूंच्या मनोबलावर परिणाम करणारे आहे…
प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या शाळांतील सर्व सहभागी खेळाडूंना क्रीडा गुण सवलतीचा लाभ देण्यात यावा, अशी आग्रही मागणी अजय शिंदे यांनी केली असून क्रीडा क्षेत्रात परिश्रम घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला समान न्याय मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये या मागणीला व्यापक पाठिंबा मिळत असून प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली







