मालवण | प्रतिनिधी
मालवण दांडी किनाऱ्यावर मासळी लिलाव होणाऱ्या ठिकाणी बंद अवस्थेत असलेला हायमास्ट टॉवर अखेर मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती तथा नगरसेविका सौ. अन्वेषा अजित आचरेकर यांच्या प्रयत्नातून दुरुस्त करण्यात आला असून परिसर पुन्हा प्रकाशमान झाला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे.
दांडी परिसरातील मासळी लिलाव केंद्राजवळील हायमास्ट टॉवर अनेक दिवसांपासून बंद असल्याने मत्स्य व्यावसायिक, मच्छिमार तसेच किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. रात्री अंधारात मासळी लिलाव तसेच खरेदी-विक्री करणे अत्यंत अडचणीचे ठरत होते.
स्थानिक नागरिक, मत्स्य व्यावसायिक व मच्छिमार यांनी ही समस्या नगरसेविका सौ. आचरेकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ दखल घेतली. वायरमन श्री. देऊलकर व श्री. बांदेकर यांच्या माध्यमातून स्वखर्चाने हायमास्ट टॉवरची दुरुस्ती करून तो कार्यान्वित करण्यात आला.
हायमास्ट सुरू झाल्याने मासळी लिलाव प्रक्रिया सुलभ झाली असून परिसरातील अंधार दूर झाला आहे. समस्या तातडीने सोडवल्याबद्दल मत्स्य व्यावसायिक व नागरिकांनी नगरसेविका सौ. अन्वेषा आचरेकर यांचे आभार मानले. तसेच तत्परतेने दुरुस्तीचे काम पूर्ण केल्याबद्दल वायरमन देऊलकर व श्री. बांदेकर यांचेही कौतुक करण्यात आले.







