मालवण दि. प्रतिनिधी :
मालवण नगरपालिकेच्या आडारी येथील कचरा डम्पिंग ग्राउंडवर कंपोस्ट खत निर्मितीच्या उद्देशाने करण्यात येणाऱ्या कामकाजात गंभीर अनियमितता आढळून आल्याने नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता सभापती सौ. पूनम चव्हाण यांनी संबंधित ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरले. नगरपालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या खत निर्मिती प्रकल्पालाच ठेकेदाराने हरताळ फासत कचऱ्याला सर्रास आग लावण्याचा प्रकार सुरू असल्याचे त्यांच्या धडक पाहणीत उघड झाले.
शहरातून संकलित होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून कंपोस्ट खत निर्मिती करण्यासाठी नगरपालिकेकडून दरवर्षी सुमारे ६५ लाख रुपये खर्च केले जातात. मात्र प्रत्यक्षात कचरा प्रक्रिया न करता तो जाळला जात असल्याची माहिती मिळताच सभापती सौ. चव्हाण यांनी स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांसह आडारी डम्पिंग ग्राउंडला अचानक भेट देत पाहणी केली.
पाहणीदरम्यान ठेकेदाराच्या करारानुसार २१ कामगार कार्यरत असणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ सात ते आठ कामगार उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. हजेरीपटाची तपासणी करताना दाखविण्यात आलेली कामगार संख्या आणि प्रत्यक्ष उपस्थिती यामध्ये मोठी तफावत आढळल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नगरपालिकेची फसवणूक होत असल्यास संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
डम्पिंग ग्राउंड परिसरात सर्वत्र कचऱ्याला लागलेली आग दिसून येत असून कोणत्याही प्रकारची कंपोस्ट खत निर्मिती होत नसल्याचे स्पष्ट झाले. कचऱ्याचे वर्गीकरण नेमके कसे होते, आग वारंवार कशी लागते, कर्मचारी नेमके कोणते काम करतात, खोटी हजेरी का लावली जाते आणि परिसर स्वच्छ का ठेवला जात नाही, असे अनेक सवाल सभापती चव्हाण यांनी उपस्थित केले. यावेळी दूरध्वनीवरून ठेकेदारालाही त्यांनी खडसावत पंधरा दिवसांत कारभार सुधारण्याची अंतिम मुदत दिली.
सभापतींचा कठोर पवित्रा पाहता ठेकेदाराने पंधरा दिवसांत सर्व व्यवस्था सुधारण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, काही वर्षांपूर्वी आदर्श पद्धतीने चालणारे हे डम्पिंग ग्राउंड सध्या घाण व दुर्गंधीचे केंद्र बनले असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याची खंत व्यक्त करत, पंधरा दिवसांत परिस्थिती सुधारून येथे स्वच्छतेची ‘गुढी’ उभारण्याचा संकल्प करावा, असे आवाहन सौ. पूनम चव्हाण यांनी केले.







