मालवण : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरी येथील जन्मोत्सवापासून खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली ‘आपला मावळा’ संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आलेली राज्यव्यापी गड-किल्ले स्वच्छता मोहीम आज ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला येथे दाखल झाली.
मोहिमेच्या आगमनानंतर शेकडो कार्यकर्ते व शिवप्रेमींनी “जय भवानी, जय शिवाजी”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडत उत्साहपूर्ण वातावरणात स्वच्छता अभियानास प्रारंभ केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी खासदार लंके यांचे स्वागत केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची सागरी राजधानी म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या स्वच्छता व संवर्धनासाठी खासदार लंके यांनी पुढाकार घेत शेकडो स्वयंसेवकांसह किल्ला परिसरात प्रत्यक्ष साफसफाई केली. या उपक्रमामुळे ऐतिहासिक वारशाचे जतन आणि पर्यटनदृष्ट्या किल्ला अधिक आकर्षक करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.
स्वच्छता मोहिमेचा भाग म्हणून लोकवर्गणीतून उपलब्ध निधीतून किल्ला परिसरात पर्यटकांसाठी बैठकीची व्यवस्था, कचरा कुंड्या, सूचना फलक तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. किल्ल्यातील शिवरायांच्या स्मृतिस्थळांवर व मंदिरांवर नामफलकही खासदार लंके यांच्या हस्ते बसविण्यात आले. तसेच बंदर जेटी परिसरातही पर्यटकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली.
या प्रसंगी मालवण तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, कुडाळ तालुकाध्यक्ष शिवाजी घोगळे, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष रविकिरण गवस, जिल्हा सचिव रुपेश जाधव, उत्तम सराफदार, नजीरभाई शेख, नयन गावडे, समीर आचरेकर, अगोस्तीन डिसोजा (मधलो), माजी नगराध्यक्ष नम्रता कुबल, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, बबलू गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी पुष्पगुच्छ देऊन खासदार लंके यांचे स्वागत केले.
ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि स्वच्छ पर्यटनाचा संदेश देणारी ही मोहीम नागरिकांमध्ये सकारात्मक जनजागृती निर्माण करणारी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.







