मालवण, दि. प्रतिनिधी : मालवण पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या सदस्यांनी पंचायत समिती स्तरावर आपला अधिकृत पक्षीय गट स्थापन केला आहे. या गटाच्या गटनेतेपदी दीपक भागोजी सुर्वे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
या संदर्भातील अधिकृत ठराव व पत्र सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले असून गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गटाचे नाव भारतीय जनता पार्टी पंचायत समिती मालवण असे निश्चित करण्यात आले आहे.
नवीन गट रचनेनुसार दीपक सुर्वे (चिंदर) यांची गटनेतेपदी, श्रीमती योजना कांबळी (कोळंब) यांची उपगटनेतेपदी तर प्रतोद म्हणून दीपक सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सीमा परुळेकर (आडवली मालडी), माधुरी मसुरकर (वराड), घनश्याम झाड (वायरी भुतनाथ) आणि संतोष गावडे (सुकळवाड) हे सदस्य गटात समाविष्ट आहेत.
गट नोंदणीसाठी आवश्यक असलेली सभेची नोटीस, बैठकीचे इतिवृत्त, निवडणूक प्रमाणपत्रे तसेच सदस्यांची प्रतिज्ञापत्रे आदी सर्व कागदपत्रे प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
पंचायत समिती स्तरावर भाजपचा अधिकृत गट स्थापन झाल्याने स्थानिक राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







