मालवण | प्रतिनिधी :
मालवण तालुक्यातील तळाशील येथील तेरेकर रापण संघाच्या बोटीला तसेच कावणाच्या साहित्याला लागलेल्या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय गाबीत समाज महासंघातर्फे मदतीचा हात पुढे करत संघाला २५ हजार रुपयांचा सहाय्य निधी प्रदान करण्यात आला.
मालवण येथील संस्कार हॉलमध्ये आयोजित गाबीत समाजाच्या कार्यक्रमादरम्यान हा मदतनिधी तेरेकर रापण संघाच्या प्रतिनिधींना सुपूर्द करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, हरीशचंद्र खोबरेकर, कार्याध्यक्ष रतनकुमार झाजम, दिलीप घारे, बाबी जोगी, सुदेश आचरेकर, सहदेव बापर्डेकर यांच्यासह समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
तेरेकर रापण संघाचे भिकाजी रेवणकर, गणपत शेलटकर, हेमंत कोचरेकर, दाजी कोचरेकर आदी मच्छीमारांनी मदतीबद्दल गाबीत समाजाचे आभार व्यक्त केले. या आर्थिक सहाय्यामुळे नुकसानग्रस्त मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.







