मालवण (प्रतिनिधी) :
जिल्ह्यात नगरपालिका व पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या गाबीत समाजातील लोकप्रतिनिधींनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून समाजाच्या उन्नतीसाठी एकत्रितपणे कार्य करावे. निवडून आलेल्या सदस्यांनी आपल्या राजकीय ताकदीचा उपयोग गाबीत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी करावा. भविष्यात राजकारणात गाबीत समाजाची ताकद व प्रभाव अधिक वाढला पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले.
जिल्हा गाबीत समाज, सिंधुदुर्गतर्फे मालवण येथील धुरीवाडा परिसरातील संस्कार हॉलमध्ये नुकताच गाबीत समाजातील नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर होते. व्यासपीठावर कार्याध्यक्ष रतनकुमार झाजम, हरी खोबरेकर, सरचिटणीस महेंद्र पराडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, माजी उपसभापती विलास ताम्हणकर, जिल्हा मच्छीमार सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी, मच्छीमार नेते वसंत तांडेल, बाबा नाईक, लक्ष्मीकांत खोबरेकर, लक्ष्मण तारी, रमेश तारी, महिला व बालविकास सभापती अन्वेषा आचरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक सुदेश आचरेकर, सहदेव बापर्डेकर, महेश कोयंडे, अन्वेषा आचरेकर, मेघा गावकर तसेच रेडी पंचायत समिती सदस्या प्रियांका घाटवळ यांचा सत्कार करण्यात आला. नगरसेवक रविकिरण तोरसकर यांचा सत्कार त्यांच्या पत्नी ज्योती तोरसकर यांनी स्वीकारला, तर मुंबईच्या नगरसेविका शिल्पा केळुसकर यांच्या वतीने त्यांचे सासरे आबा केळुसकर यांनी सन्मान स्वीकारला. जिल्हा बँक संचालक मेघनाद धुरी यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
चंद्रशेखर उपरकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मालवण, वेंगुर्ले व देवगडच्या किनारी भागात गाबीत समाजाची मोठी वस्ती असून ज्या ठिकाणी समाजाचे प्राबल्य आहे, तेथे निवडणुकांमध्ये एकजूट दाखविणे आवश्यक आहे. किनारपट्टीवरील मच्छीमार व पर्यटन व्यावसायिकांना मिळालेल्या बांधकामविषयक नोटिसांविरोधात समाजाने एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी समाजाने दिलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत गाबीत समाजाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमास श्रमजीवी रापण संघाचे अध्यक्ष दिलीप घारे, पारंपरिक मच्छीमार संघटनेचे नेते बाबी जोगी, मालवण गाबीत समाजाचे खजिनदार मिथुन मालंडकर, पवनकुमार पराडकर, राधिका कुबल, दीक्षा ढोके, अनुष्का मालंडकर, अतुल मालंडकर, पूजा सरकारे, दिनकर शेलटकर, संजय केळुसकर, केतन जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.







