Sukanya Shilpa Gaonkar-Dongre from Achara, Malvan in Sindhudurg district has been selected for the Maharashtra women’s team for the 14th National Para Sitting Volleyball Championship to be held in Meerut, Uttar Pradesh.
उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या 14 व्या नॅशनल पॅरा सिटींग व्हॉलीबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या दिव्यांग महिला संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे.या संघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरा गावची सुकन्या शिल्पा गांवकर-डोंगरे हिची निवड झाली आहे. तिच्या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
व्हॉलीबॉल पॅरासिटींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने १४ व्या नॅशनल पॅरा सिटींग व्हॉलीबॉल चॅम्पियनशीप दिव्यांग महिलांच्या महाराष्ट्र २०२६ च्या संघाची निवड चाचणी स्पर्धा नुकतीच नागपूर येथे पार पडली. ही निवड चाचणी स्पर्धा पॅरा सिटींग व्हॉलीबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नामदेवराव बालहार दादा, सेक्रेटरी राहुल लेकरूपाले, जॉईंट सेक्रेटरी गुरुदास राऊत, स्टेट एकलव्य सपोर्ट अवॉर्ड विजेते दिनेश यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
यापूर्वी नाशिक येथे पार पडलेल्या पहिल्या युनायटेड राष्ट्रीय मास्टर्स क्रीडा स्पर्धेत सहभागी होत शिल्पा गांवकर-डोंगरे हिने कांस्यपदक पटकावले होते. तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच तिला राज्य संघात संधी मिळाली आहे.
महाराष्ट्र महिला पॅरा सिटींग व्हॉलीबॉल संघात निवड झाल्याबद्दल सुकन्या शिल्पा गांवकर-डोंगरे हिचे क्रीडा क्षेत्रासह विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. तिच्या पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.







