वेंगुर्ला – प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील रेडी जि.प. मतदारसंघाचे विजयी उमेदवार प्रीतेश राऊळ तसेच रेडी पंचायत समिती मतदारसंघाच्या विजयी उमेदवार सौ. प्रियांका घाटवळ यांचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई तसेच जि.का.का. सदस्य व उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी दोन्ही विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमावेळी रेडीचे सरपंच रामसिंग राणे व शिरोड्याचे माजी सरपंच मनोज उगवेकर उपस्थित होते.
वेंगुर्ले तालुक्यातील रेडी जि.प. मतदारसंघ हा भारतीय जनता पक्ष चा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. प्रीतेश राऊळ यांनी सलग दुसऱ्या वेळी या मतदारसंघातून विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले आहे. मागील कार्यकाळात त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मतदारांनी त्यांना पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून दिले.
दरम्यान, रेडी पंचायत समिती मतदारसंघातून प्रथमच निवडणूक लढवणाऱ्या सौ. प्रियांका घाटवळ या संघटनेच्या बळावर विजयी झाल्या. त्यांना स्थानिक केरवाडा ग्रामस्थांची भक्कम साथ लाभली.
दोन्ही विजयी उमेदवारांचा सत्कार रेडी तसेच शिरोडा–केरवाडा येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन करण्यात आला.
यावेळी नितीन तारी, पांडुरंग घाटवळ, शंकर घाटवळ, गोपाळ बटा, नारायण मोरजे आदी उपस्थित होते.







