MLA Nilesh Rane held a meeting at Kudal Prant Office regarding CRZ action against Malvan fishermen and tourism businesses, assuring support and a fair resolution.
मालवण प्रतिनिधी
मालवण येथील मच्छीमार व पर्यटन व्यवसायाशी संबंधित बांधवांवर सी.आर.झेड. नियमांअंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर कुडाळ प्रांत कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मच्छीमार व पर्यटन व्यावसायिकांना न्याय मिळावा आणि योग्य तो तोडगा काढावा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळुसे व तहसीलदार सचिन पाटील उपस्थित होते. संबंधित विभागाच्या कारवाईमुळे स्थानिक मच्छीमार व पर्यटन व्यवसायिकांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेवर सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न बैठकीत करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष विकी तोरस्कर, जिल्हा परिषद सदस्य दादा साईल, काका कुडाळकर, मालवण नगरपरिषदेचे नगरसेवक सहदेव बापर्डेकर, नगरसेविका अन्वेशा आचरेकर, नगरसेवक महेश कोयंडे यांच्यासह अनेक मच्छीमार व पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.
नगरसेविका अन्वेशा आचरेकर यांनी सांगितले की, भाजप महायुती सरकार मच्छीमार बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. “स्थानिकांच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेऊन शासन स्तरावर सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत,” असे त्यांनी नमूद केले. या बैठकीमुळे मच्छीमार व पर्यटन व्यावसायिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून प्रशासनानेही विषय गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.







