Thousands of devotees witnessed the midnight Bhasma Aarti at the famous crystal Shivling temple in Savarwad, organized by Rudranad Foundation on the occasion of Mahashivratri.

मालवण (प्रतिनिधी):
“ॐ नमः शिवाय… हर हर महादेव” या शिवनामाच्या अखंड घोषात सावरवाड येथील प्रसिद्ध स्फटीक शिवलिंग मंदिरात रविवारी मध्यरात्री भव्य भस्म आरती संपन्न झाली. रुद्रनाद फाउंडेशनचे सर्वेसर्वा श्री रुद्रराज यांनी साधकांसमवेत स्फटीक शिवलिंगासमोर ही आरती केली. महाशिवरात्रीनिमित्त आयोजित या सोहळ्याला हजारो शिवभक्तांनी उपस्थिती दर्शवत भक्तिभावाने जागर केला.
सावरवाड येथे अलीकडेच उभारण्यात आलेल्या रुद्रनाद फाउंडेशन ट्रस्टच्या शिव मंदिरात दोन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल झाले होते.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवतत्त्वावर आधारित विविध यज्ञ, वेदपठण, रुद्राभिषेक आणि महामृत्युंजय मंत्र जप असे धार्मिक विधी पार पडले. रविवारी रात्री सुमारे अकरा वाजता भस्म आरतीला प्रारंभ झाला. शंखनाद, घंटानाद, डमरू, झांज आणि ढोलांच्या गजरात तसेच शिवनामाच्या घोषात वातावरण दुमदुमून गेले. या अलौकिक वातावरणात उपस्थित भक्त तल्लीन झाले होते.

सुमारे पाच हजार शिवभक्तांनी या भस्म आरतीचा अनुभव घेतला. आरतीनंतर “ॐ नमः शिवाय” चा अखंड जप पहाटेपर्यंत सुरू होता. महाशिवरात्रीचा हा उत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.







