First-year engineering students of Metropolitan Institute of Technology and Management (MITM), Malvan, conducted a two-day NSS special camp, organizing cleanliness drives at Chivla Beach and Sindhudurg Fort to promote environmental awareness and social responsibility.
मालवण (प्रतिनिधी):
मालवण तालुक्यातील सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM) कॉलेजच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागामार्फत आयोजित दोन दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मालवण समुद्रकिनारा आणि ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग येथे स्वच्छता मोहीम राबवली.
शिबिराच्या पहिल्या दिवशी मालवणमधील प्रसिद्ध चिवला बीच येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. पर्यटकांच्या वाढत्या वर्दळीमुळे किनाऱ्यावर साचलेला प्लास्टिक कचरा, काचेच्या बाटल्या व इतर टाकाऊ वस्तू स्वयंसेवकांनी गोळा करून परिसर स्वच्छ केला. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश पर्यटक आणि स्थानिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला.
दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेतली. गडाच्या तटबंदी परिसरात तसेच पर्यटन मार्गावर साचलेला कचरा गोळा करण्यात आला. आपला ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आणि पर्यटन स्थळे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी अधोरेखित केले.
या उपक्रमासाठी संस्थेचे स्टाफ इन्चार्ज सिद्धेश शिंदे, साई पवार, दीपिका फर्नांडिस आणि सुदेश जामसंडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. वरिष्ठ विद्यार्थी साहिल शिंदे यांनी शिबिरासाठी आवश्यक साहित्याची जबाबदारी सांभाळली. तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यांनीही या मोहिमेस सक्रिय सहकार्य केले.
या श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये टीमवर्क, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरणाबद्दलची जाणीव अधिक दृढ झाली असून त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.







