On the occasion of Mahashivratri, a grand 15-layer rice (Akshata) Mahapuja was offered around the Shivling at Shri Dev Rameshwar Temple in Malvan, drawing a huge crowd of devotees.
मालवण (प्रतिनिधी):
महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात शिवलिंगाभोवती पंधरा थरांची अक्षतांची (तांदळाची) भव्य महापूजा बांधून उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या अनोख्या महापुजेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
देऊळवाडा येथील श्री देव रामेश्वर मंदिरात १२ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी या कालावधीत पुराण वाचन, कीर्तन, पालखी मिरवणूक तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील प्रमुख आकर्षण म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री ११ ते १२ या वेळेत गाभाऱ्यातील शिवपिंडीभोवती बांधण्यात आलेली १५ थरांची तांदळाची महापूजा ठरली.
पूर्वी ही महापूजा बांधण्यासाठी माडाच्या झावळाच्या पातींचा (चुडतीचा) उपयोग करून रिंग तयार केली जात असे. मात्र तांदळाच्या वजनामुळे त्या रिंग तुटण्याच्या घटना घडत असल्याने अडचणी निर्माण होत असत. त्यामुळे अलीकडील काळात पातींच्या रिंगाऐवजी सोन्याचा मुलामा दिलेल्या चांदीच्या रिंगांचा वापर करून अधिक आकर्षक व सुरक्षित पद्धतीने महापूजा बांधली जाते.
या महापुजेमध्ये तांदळाचे एकावर एक असे १५ थर रचले जातात. प्रत्येक थरावर बेलपत्र अर्पण केले जाते, तर अंतिम थरावर सोन्याचे पान ठेवून महापूजा सजवली जाते. या अलौकिक सजावटीचे दर्शन घेण्यासाठी तसेच ग्रामदैवत श्री रामेश्वर देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
रात्री मंदिर परिसरात पालखी प्रदक्षिणा सोहळा पार पडला. त्यानंतर दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.








