BJP District President Prabhakar Sawant assured that under the leadership of PM Narendra Modi and CM Devendra Fadnavis, there will be no shortage of development funds in the district. He was speaking at a felicitation ceremony of newly elected ZP, Panchayat Samiti members and corporators at Kolamb.
मालवण (प्रतिनिधी):
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार कार्यरत असून जिल्ह्यात खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून विकासासाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ठाम ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.
भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवकांचा सत्कार सोहळा सोमवारी कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमात प्रभाकर सावंत यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, नगरसेवक मंदार केणी, शिल्पा खोत, विलास हडकर, बबलू राऊत, पंकज सादये, महेंद्र चव्हाण, विजय निकम, जीवन भोगावकर, माधुरी मसूरकर, महेश मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रभाकर सावंत पुढे म्हणाले की, मालवण नगरपालिकेतील पराभव अनपेक्षित होता; मात्र त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपने शतप्रतिशत यश संपादन केले. जिल्हा परिषदेच्या ५० पैकी ३१ जागांवर भाजपने निवडणूक लढवून त्यापैकी २७ जागांवर विजय मिळवला, तर पंचायत समितीच्या १०० पैकी ६३ जागांवर उमेदवारी देत ५८ जागांवर यश मिळवले. हा विजय कार्यकर्त्यांच्या परिश्रमांचे फळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
आगामी पाच वर्षांत मतदारसंघात सातत्यपूर्ण संपर्क, समन्वय आणि संवाद राखून संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी नवनिर्वाचित सदस्यांना केले. राजकारणात काम करताना काही बाबींवर दुर्लक्ष करणे आवश्यक असते; काळच त्याचे उत्तर देतो, असे सांगत त्यांनी पक्षाच्या वाढत्या प्रवासाचा उल्लेख केला.
जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी २०१९ पासून तालुक्यात भाजपची विजयी घोडदौड सुरू असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच हा विजय शक्य झाला असून केंद्र आणि राज्यातील सत्तेचा लाभ विकासकामांसाठी घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.
तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी प्रत्येक कार्यकर्ता या निवडणुकीत उमेदवाराप्रमाणे लढल्याचे सांगत, पदाची अपेक्षा न ठेवता जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी विलास हडकर, मंदार केणी आणि शिल्पा खोत यांनीही मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन धोंडू चिंदरकर यांनी केले. कार्यक्रमादरम्यान जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांचा विशेष सत्कार करण्यात आला.







