Maha Shivratri will be celebrated on February 15 at Nirvana Sphatik Shivling Temple in Varad Savarwad, Malvan. Devotees can attend Rudrabhishek, Yajna, classical music, Bhasma Aarti and night-long meditation.
मालवण (प्रतिनिधी):
मालवण तालुक्यातील वराड सावरवाड येथील रुद्रनाद फाउंडेशन ट्रस्टच्या निर्वाण स्फटीक शिवलिंग मंदिरात दि. १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री उत्सव भक्तिभावाने आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त दिवसभर आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रुद्रनाद फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून सन २०२० मध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आली. येथे भारतातील सर्वात मोठे वायव्यमुखी हिमालयीन स्फटीक शिवलिंग स्थापित करण्यात आले असून या अद्वितीय शिवलिंगामुळे मंदिराची ख्याती राज्यभर पसरली आहे. सध्या देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येत असून योगसाधना व ध्यानसाधनेसाठी हे स्थान विशेष प्रसिद्ध झाले आहे.
दरवर्षी महाशिवरात्री उत्सव येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भस्म आरती हा उत्सवाचा प्रमुख आकर्षणबिंदू असणार आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे –
सकाळी रुद्राभिषेक व यज्ञ, सकाळी ७ ते ८ या वेळेत ग्रामस्थांसाठी अभिषेक, दुपारी १२ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता रुद्री पाठ, सायंकाळी ७ वाजता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, रात्री ११ वाजता भस्म आरती आणि त्यानंतर ‘ॐ नमः शिवाय’ अखंड नामस्मरण व पहाटेपर्यंत ध्यानसाधना होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी रुद्राभिषेकाने शिवरात्री उत्सवाची सांगता होईल.
या धार्मिक सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रुद्रनाद फाउंडेशनचे श्री. रुद्रराज यांनी केले आहे.








